अहमदनगर : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात आज बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. दुर्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या (12th Exam 2022 Time Table) असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे बोर्डाला याची माहिती कळवण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला जाणार आहे. त्यानंतर या नेमक्या कोणत्या प्रश्नपत्रिका होत्या, हे स्पष्ट होईल, असं पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितलं आहे. (Pune Board Exams)

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादसमोर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने (क्रमांक एम. पी. ३६ एच. ०७९५) पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी ही आग अटोक्यात आणण्याचं काम सुरू केलं. आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.

Sharad Pawar: नवाब मलिक यांची ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशी; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, अंमलदार कैलास देशमुख घटनास्थळी गेले. संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग अटोक्यात आणली. महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेनंतर नाशिक-पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून वळवण्यात आली आहे.

घटना नेमकी घडली कशी?

पेपरफुटी टाळण्यासाठी आणि गोपनीयता म्हणून प्रश्नपत्रिका छापाईचे काम महाराष्ट्राऐवजी बाहेरच्या राज्यात देण्यात आले होते. बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी या प्रश्नपत्रिका आणल्या जात होत्या. हे वाहन नगर जिल्ह्यात आल्यावर पहाटेच्या सुमारास आग लागली. आग कशी लागली, याचे कारण अद्याप पुढे आलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ती लागली असावी, असे चालक-वाहक सांगत आहेत. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन तसंच या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असे अनेक वाद सुरू आहेत. मात्र, परीक्षा ऑफलाइन आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्यावर परीक्षा विभाग ठाम आहे. अशातच ही घटना घडली आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रश्नपित्रका वेळेत छापून आणण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here