मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता आक्रमक झाला आहे. नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात बळजबरीने नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. तर नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि सना मलिक या काहीवेळापूर्वी नूर मंजील या निवासस्थानी गेल्या होत्या. यानंतर आता निलोफर मलिक या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. थोड्याचवेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चा घेऊन ईडीच्या कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ‘ईडी’च्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Sharad Pawar: नवाब मलिक यांची ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशी; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
नवाब मलिक (Nawab Malik) यांना चौकशीसाठी ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात नेण्यात आले आहे. येथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काही अंतरावरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याठिकाणी जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून यासंदर्भात भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे मंत्री आहेत. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व संकेत धुडकावून त्यांना ताब्यात घेतले. ही गंभीर गोष्ट असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
Nawab Malik: सीआरपीएफ जवानांसह ईडी अधिकारी भल्या पहाटेच नवाब मलिक यांच्या घरी, बळजबरीने कार्यालयात नेलं?
नवाब मलिक हे साधारण पावणेआठच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. तेव्हापासून तब्बल तीन तास उलटल्यानंतरही नवाब मलिक यांची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने कुख्यात गुंड दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी इकबाल कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचप्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे.

जयंत पाटील यांची ‘ईडी’वर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडीच्या या कारवाईवर टीका केली. सत्तेच्या दुरूपयोगाचं हे आणखी एक उदाहरण आहे. ईडीचे अधिकारी पहाटे नवाब मलिक यांच्या घरी गेले. कोणतीही माहिती किंवा समन्स न देता नवाब मलिक यांना कार्यालयात नेण्यात आले. ही कारवाई करताना सगळ्या गोष्टींची पायमल्ली करण्यात आली. नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणं बाहेर काढली आहेत. त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. नवाब मलिक यांची नक्की कोणत्या प्रकरणात चौकशी होत आहेत, हेदेखील आम्हाला माहिती नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here