मुंबई: महाराष्ट्रात आज कोरोनाबाधीत ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबईतील असून १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. आजच्या बाधीत रुग्णांमध्ये पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील करोनाबाधीत रुग्णांची संख्या ४९० झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज सहा करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी प्रत्येकी १ रुग्ण वसई-विरार, बदलापूर, जळगाव, पुणे येथील आणि २ जण मुंबईतील आहेत.

या ६ रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे:

१) वसई-विरार येथे मृत्यू झालेला ६८ वर्षीय पुरुष हा दिनांक २९ मार्च २०२० रोजी येथील एका खासगी रुग्णालयात भरती झालेला होता. त्याचा भाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेहून आला होता पण भाच्याला कोणतीही लक्षणे नव्हती. या रुग्णास मधुमेह होता.

२) ठाण्यातील बदलापूर येथे मृत्यू झालेली महिला ही एका खासगी रुग्णालयात भरती होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर असलेली ही महिला बऱ्याच काळापासून बिछान्याला खिळून होती. त्यामुळे तिला बेडसोर देखील झालेले होते. तिचा कोणत्याही परदेशातील प्रवासाचा इतिहास नव्हता.

३) जळगाव येथे मृत्यू झालेला ६३ वर्षीय पुरुष हा जळगाव मधील करोनाबाधीत रुग्णाचा सहवासित होता. त्याला मधुमेह, उच्च रक्तादाब होता आणि १ महिन्यापूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मृत्यू झाला.

४) पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेली ५० वर्षीय महिला २८ मार्च रोजी भरती झाली होती. तिने परदेशात प्रवास केलेला नव्हता.

५) मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू पावलेला ६५ वर्षीय पुरुष हा मूत्रपिंडाच्या व्याधीचा जुना रुग्ण होता. त्याने कोठेही परदेशात प्रवास केलेला नव्हता.

६) मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका ६२ वर्षाच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-

मुंबई- २७८
पुणे ( शहर व ग्रामीण भाग )- ७०
सांगली- २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा- ५५
नागपूर- १६
यवतमाळ- ४
अहमदनगर- २०
बुलडाणा- ५
सातारा, औरंगाबाद प्रत्येकी- ३
कोल्हापूर, रत्नागिरी प्रत्येकी- २
सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद प्रत्येकी- १
इतर राज्य – गुजरात- १

राज्यात करोनाचे एकूण ४९० रुग्ण आतापर्यंत आढळले असून त्यापैकी ५० जणांना घरी सोडण्यात आले आहे तर २६ करोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

राज्यात आज एकूण ५९५ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ हजार ३९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३०७२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

‘मरकज’मधून परतलेल्या ७ जणांना करोना

दिल्लीतील निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here