मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं आहे. कोर्टात हजर केल्यानंतर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला बळजबरीने ताब्यात घेऊन अटक केली असल्याचा दावा केला आहे. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी माझ्या घरी येऊन आधी बळजबरीने ताब्यात घेतलं आणि नंतर कार्यालयात नेऊन मला समन्स बजावले आणि माझी अटक दाखवली, असं मलिक यांनी म्हटलं आहे. (Nawab Malik Arrest Latest Updates)

विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर नवाब मलिक यांना हजर करण्यात आलं. मलिक यांची ईडी कोठडी मिळवण्यासाठी ईडीचे प्रयत्न सुरू आहेत. ईडीची बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त महन्यायअभिकर्ता अनिल सिंग कोर्टात उपस्थित असून नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई युक्तीवाद करत आहेत.

‘अटकच करायची असेल तर पर्याय नाही’, मलिकांच्या अटकेनंतर भुजबळांची हताश प्रतिक्रिया

कोर्टात ईडीने काय दावा केला?

‘३ फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिमविरुद्ध एनआयएकडून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसंच त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. दाऊदचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे आहेत. यामध्ये दहशतवादी कृत्ये, बनावट नोटा चलनात आणणे, अवैध पैशांचा व्यवहार, हवाला, त्याचे लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महंमद, अल-कायदा अशा अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही संबंध आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर हिचाही गुन्ह्यात संबंध होता. कुर्लामध्ये गोआवाला कंपाऊंड ही मालमत्ता हसीनाच्या मालकीची आहे. ईडीच्या तपासात असे निष्पन्न झालं की, कुर्लामधील गोआवाला कंपाऊंड मालमत्ता वारसा हक्काप्रमाणे मरियम आणि मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची होती. मात्र ती मालमत्ता नवाब मलिक यांच्या मालकीच्या कंपनीने दाऊदच्या डी-गॅंगच्या लोकांशी संगनमत करून विकत घेतली,’ असा युक्तीवाद ईडीतर्फे अनिल सिंग यांनी केला आहे.

दरम्यान, ई़डीच्या युक्तीवादानंतर नवाब मलिक यांच्याकडून अमित देसाई हे म्हणणं मांडतील आणि त्यानंतर कोर्ट याबाबतचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here