जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व घटनाक्रमाबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईडीने प्रथमदर्शनी तपासात काही बाबी निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना अटक केलेली असू शकते. मलिक यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलं आहे,’ असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. (Ujjwal Nikam Updates)

जळगावात पत्रकारांशी उज्ज्वल निकम बोलत होते. नवाब मलिक यांच्या अटकेनंतरची न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल याबाबतही निकम यांनी माहिती दिली. ‘मलिक यांच्याविरोधात ईडीने सकृतदर्शनी पुरावा गोळा केला आहे. तो सबळ आहे का? तसंच मलिक यांच्याकडून काही बाबींवर समाधानकारक खुलासा न आल्याने त्याच्या आधारावर मलिक यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून होऊ शकते, अशी शक्यता निकम यांनी व्यक्त केली आहे.

कोर्टात हजर झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ईडीवर केला गंभीर आरोप

दुसरीकडे, कुठलाच पुरावा नसताना मलिक यांच्यावर कारवाई केल्याबाबत आणि थेट तसा पुरावा नसतानाही राजकीय खेळीतून ही कारवाई केल्याचं मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगितलं जाईल आणि ते न्यायालयीन कोठडी मागतील व त्यानंतर मलिक यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्टच्या कलम ५० नुसार प्रथम समन्स पाठवावा लागतो. नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो. यानुसार ईडीने कारवाई केली आहे का? सबळ पुरावा असला तरच ईडी अटक करते. त्यामुळे ज्या पुराव्याच्या आधारावर मलिक यांना अटक झाली तो पुरावा किती सबळ आहे, हे न्यायालयात स्पष्ट होईल. सध्या ही कारवाई कायदेशीर व बेकायदेशीर अशा चर्चा रंगत असल्या तरी न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणं औत्सुक्याचे आहे,’ असं यावेळी अ‍ॅड. निकम म्हणाले.

दरम्यान, काही वेळापूर्वी नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाकडून आपला निर्णय दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here