नवी दिल्लीः दिल्लीतील आनंद विहारमध्ये स्थलांतरीत मजुरांची गर्दी आणि निजामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले नागरिक या दोन घटनांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनांमुळे करोना व्हायरसविरोधातील देशाच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे, असं राष्ट्रपती भवनकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी राज्यांचे राज्यपाल आणि केंद्र शासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशात घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये कुणीही उपाशी राहायला नको पण त्याबरोबर करोनाचा प्रादुर्भावही रोखला गेला पाहिजे, असं कोविंद यांनी सांगितलं.

करोना हा अदृश्य शत्रू आहे. त्याविरोधातील लढाईत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

करोनाविरोधातील लढाईत देशाने अभूतपूर्व अशी शिस्त, एकता आणि धैर्य दाखवले आहे. पण दिल्लीच्या आनंद विहार बस स्थानकातील स्थलांतर करणाऱ्या मजुरांची गर्दी आणि निझामुद्दीनमधील तबलीघी जमातची मरकझमधील गर्दी या दोन घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. करोनाविरोधी लढाईत सरकारच्या प्रयत्नांना यामुळे जबर झटका बसला आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

राज्य आणि केंद्र शासित राज्यपालांशी आम्ही संवाद साधला. आपापल्या राज्यातील धर्मगुरुंशी संपर्क साधा. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुयायांना गर्दी न करण्याचं आवाहन धर्मगुरुंनी करावं, असा सल्ला राज्यपालांना दिल्याचं नायडू ट्विटमध्ये म्हणाले.

पिकांची कापणी, धान्याची खरेदी आणि त्यांच्या साठवणुकीच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्या. शेतकऱ्यांसाठीच्या कृषी साहित्यात कुठलीही अडकाठी येणार नाही याची राज्यातील यंत्रणांना काळजी घ्यावी. तसंच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा व्यंकय्या नायडूंनी तीव्र निषेध केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here