नगर शहरात बुधवारी एसटी बसवर दगडफेक करताना मनोज विठ्ठल वैरागर (रा. शांतीपूर, तारकपूर, नगर) याला पकडण्यात आले. तो एसटीच्या पारनेर आगारातील कर्मचारी असल्याचं आढळून आलं आहे. दगडफेक झालेल्या बसचे चालक दत्तात्रय गंगाधर गिरी (रा. गणेशनगर ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात मनोज वैरागर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरात तारकपूर बसस्थानक ते पत्रकार चौक या रस्त्यावर झुलेलाल चौकात ही घटना घडली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बससेवा सुरू झाली आहे. अशातच संगमनेर-नगर ही बस नगर शहरातून जात असताना तारकपूर बसस्थानकाच्या जवळच बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे बसची पुढील काच फुटून नुकसान झाले. दगड डाव्या बाजूला लागल्याने चालक दत्तात्रय गिरी थोडक्यात बचावले. त्यांनी दगडफेक करणाऱ्याला पाहिले होते. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. तोफखान्याचे पोलीस घटनास्थळी आले. गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी वैरागर याच्यासंबंधी अधिक माहिती घेता तोही पारनेर आगारातील एसटीचाच कर्मचारी असल्याचं आणि संपात सहभागी असल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेकीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामध्येही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संप चिघळवण्यासाठी, तो मोडून कामावर येणाऱ्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. शेवगाव येथील एका घटनेत तर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडेही बोट दाखवले गेले होते. मात्र, आता नगर शहरातील घटनेत खुद्द एसटीचा कर्मचारीच दगडफेक करत असल्याचं आढळून आलं आहे.