सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग: कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सवास गुरुवारी सुरुवात झाली. आज पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांना देवीचे दर्शन खुले केले आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब व केंद्रीय मंत्री नारायण राणे त्याचसोबत स्थानिक खासदार विनायक राऊत व अन्य लोकप्रतिनिधी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतील. यावर्षी शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने शासनाच्या नियम व अटींचे पालन करून यात्रोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे यावर्षी पाच ते सहा लाख भाविक येतील असे देवस्थानचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी सांगितले आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे आंगणेवाडीची यात्रा मर्यादित स्वरुपात झाली होती. मात्र, यंदा मोठ्या उत्साहात भराडी देवीची यात्रा होणार असून जवळपास पाच लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने महसूल व पोलिस प्रशासन व स्थानिक व्यवस्थापन सज्ज झाले आहे. प्रशासनाने कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच दर्शन दिले जात आहे. भराडी देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक गर्दी करण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून मंदीर परीसरात ठीकठीकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सव होत आहे भाविकांना सुलभ दर्शनासाठी ११ रांगांची व्यवस्था आहे. दर्शनासाठी एकाचवेळी जास्त गर्दी होऊ नये यासाठी ९ प्रमुख रांगा व दोन विशेष रांगा अशी सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी, व्हीव्हीआयपी देवीच्या दर्शनासाठी रांगा आहेत.दरवर्षी किमान सहा ते सात लाख भाविक आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावतात. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून आंगणेवाडीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होते. आंगणेवाडीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या सोडल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here