पिंपळे निलखचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आमदारांच्या हुकूमशाहीला कंटाळून मी राजीनामा देत आहे, असं म्हणत भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप कामठे यांनी प्रवेशाची घोषणा केली नसली तरी ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला शह
राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असल्याने महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होणार, याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. राष्ट्र्वादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नेहमीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची राहिली आहे. मागील महापालिका निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता असल्याने या शहरातील सत्ता काबीज करण्यात भाजपला यश आलं होतं. मात्र आता भाजपला दूर करत पुन्हा आपल्या बालेकिल्ल्यात पक्षाला सत्तेत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा देऊन भाजपला धक्का दिला होता. विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नाही, नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे, असा थेट आरोप करत बोराटे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीची वाट पकडली होती. त्यानंतर पिंपळे गुरवमधील भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. सांगवी, पिंपळे गुरव या भागात भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं वर्चस्व आहे. चंदा लोखंडे यादेखील आमदार जगताप समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र लोखंडे यांनी पक्ष सोडल्याने तो आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर आता आणखी एका नगरसेवकाने पक्ष सोडण्याची घोषणा केल्याने भाजपसाठी आगामी महापालिका निवडणूक आव्हानात्मक ठरणार, हे स्पष्ट झालं आहे.