माध्यमांतून प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध एकमेव टी-२० सामनाही खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर संघ वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल आणि त्यानंतर यूएईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आशिया चषकात सहभागी होणार आहे. गेल्या वेळी आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती.
एक भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “बायो-बबल ब्रेक्सबद्दल चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक खेळाडूला व्यस्त वेळापत्रकाची माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांना कधी विश्रांती घ्यायची आहे, याचा विचार करण्यासाठीही वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुसरा भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार, असे वाटत आहे. आशिया चषक ही पहिलीच स्पर्धा असेल, जिथे भारत टी-२० विश्वचषकापूर्वी संघाचे संयोजन तयार करण्यासाठी पहिला संघ मैदानात उतरवेल.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघ आयपीएलनंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. ९ ते १९ जून या कालावधीत दोन्ही देशांमध्ये पाच टी-२० सामने खेळवले जातील. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ बर्मिंगहॅममध्ये कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर संघाला इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. शेवटचा एकदिवसीय सामना १७ जुलै रोजी होणार आहे.