पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शहरात अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा झालेल्या बैठकीतही त्यांनी या आदेशाची आठवण करुन दिली. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचं आढळून येईल, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता.
येरवडा परिसरात मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कंजार भाट वस्तीतील सनी माछरे याच्या कॅरम हाऊसच्या वरील बंदिस्त खोलीमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी तब्बल १९ जण फ्लॅश पत्त्याचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी या १९ जणांवर कारवाई केली. तसंच त्यांच्याकडून ७ मोबाईल, १४ हजार ३४० रुपये रोख असा एकूण २४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, महालक्ष्मी लॉन्सजवळही जुगार अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या १३ जणांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.