युक्रेनच्या राजधानीवर रशियाकडून बॉम्बवर्षाव होत असताना इथं अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी कीव्ह स्थित भारतीय दूतावासानं स्वीकारलीय.
रोमानिया आणि हंगेरी मार्गे भारतीय मायदेशी परतणार
रशियानं युक्रेनवर हवेतून, जमिनीवरून आणि समुद्राच्या मार्गानंही हल्ला चढवला आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधील भारतीय दूतावासानं एक अॅडव्हायजरी जारी केलीय. दूतावासाकडून इथल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आलीय. केंद्र सरकार आणि भारतीय दूतावास रोमानिया आणि हंगेरीच्या मार्गानं भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
LIVE युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाला आग, रशियन सेना ‘कीव्ह’मध्ये दाखल
‘एअर इंडिया’ची दोन विमानं सज्ज
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी ‘एअर इंडिया’ची दोन विशेष विमानं धाडण्यात येणार आहेत. ‘एअर इंडिया’ची ही दोन विमानं आज रोमानियाची राजधानी ‘बुकरेस्ट’साठी रवाना होतील. रोमानिया – युक्रेन सीमेवर पोहचू शकणाऱ्या भारतीय नागरिकांना घेऊन ही विमानं माघारी परणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सीमेवरून भारतीय नागरिकांना बुकरेस्ट विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी मदत करणार आहेत.
पोलंडचीही भारताला मदत
भारतात उपस्थित असलेले पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोवस्की यांनीही भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी हरएक तऱ्हेनं मदत पुरवण्याचं आश्वासन दिलंय. सोबतच त्यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचीही निंदा केलीय. ‘युक्रेनवर हल्ला करून रशियानं आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलंय’ असं बुराकोवस्की यांनी म्हटलंय. ‘युक्रेन हा एक शांतिप्रिय देश आहे तर रशिया हा हल्लेखोर देश आहे’, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
उल्लेखनीय म्हणजे, पोलंडची एक सीमा युक्रेनला लागून आहे तर दुसरी सीमा बेलारूसला… बेलारूसनं रशियाला हल्ल्यात प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केल्याचंही समोर आलंय. बेलारूससोबत युद्धाभ्यास करण्याची सबब सांगूनच रशियानं आपलं सैन्य युक्रेन सीमेपर्यंत पोहचवलं.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा इशारा
शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीव्हवर अनेक मिसाईल आणि बॉम्ब हल्ले करण्यात आले. त्यामुळे जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरावर रशिया लवकरच ताबा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आज रात्री रशियन सेना युक्रेनची राजधानी कीव्हच्या काही भागांत दाखल होऊ शकते, असा इशारा खुद्द युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलाय. युक्रेनियन सेनेच्या चार तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षणासाठी तैनात आहेत, असंही उप-संरक्षण मंत्री हन्ना मलयार यांनी म्हटलंय.
हेल्पलाईन क्रमांक
भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या फोन क्रमांक – ०११-२३०१२११३ / २३०१४१०४ / २३०१७९०५ किंवा १८००११८७९७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा