रशियानं युक्रेनची राजधानी कीव्हला टार्गेट केलंय. रशियन सैन्यानं कीव्हला दुतर्फा घेरलंय. हळूहळू रशिया कीव्हवर मजबूत पकड घेताना दिसतंय. अशा परिस्थितीत कीव्ह सरकार किती वेळ टिकून राहणार? याकडे अनेक देशांचं लक्ष लागलंय. याच दरम्यान, युक्रेन लष्कराच्या १५० हून अधिक सैनिकांनी हत्यार टाकल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय.
दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हच्या सरकारी क्वार्टरजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळतेय. कीव्हपासून अवघ्या ४ किमी अंतरावर रशियन हेर दिसल्याची माहिती युक्रेनच्या लष्करानं दिलीय. ईशान्य आणि पूर्वेकडून रशियाचे सैन्य कीव्हच्या दिशेनं पुढे सरकत असल्याची माहिती युक्रेन लष्करानं दिलीय.
दरम्यान, युक्रेन सेनेचे १८ टँक, ७ रॉकेट सिस्टम आणि ४१ मोटार वाहन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला. सोबतच १५० हून अधिक युक्रेनियन सैनिकांनी हत्यारं खाली टाकत रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करल्याचा दावाही रशियानं केलाय.
LIVE युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी ‘एअर इंडिया’ची दोन विमानं सज्ज
युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा, रेडिएशन स्तर वाढला
दरम्यान, रशियानं युक्रेनच्या चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे. युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीनं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लान्टच्या रेडिएशन पातळीत प्रचंड वेगानं वाढ झाल्याचं दिसून आलंय, अशी दावा ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेनं केलाय.
युक्रेनची एकाकी झुंज सुरूच
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सल्लागारानं दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने कीव्हच्या आकाशात घिरट्या घालणारं एक विमान आणि दोन क्रूझ क्षेपणास्त्रं हाणून पाडली आहेत. यापूर्वी, शुक्रवारी सकाळी एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत कीव्हच्या आकाशात एक मोठा स्फोट झाल्याचं दिसून येत होतं. या स्फोटात रशियाचं एक विमान उद्ध्वस्त केल्याचा दावा युक्रेननं केला होता.