औरंगाबाद : ‘माझे नाव सत्तार आहे. यातील ‘र’ काढून टाकला तर ‘सत्ता’ कायम राहते. त्यामुळे मी सतत सत्तेत आहे. घोडा कोणताही असो लगाम मात्र माझ्याच हाती आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी केले.

नेहरू भवन इमारतीच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल सत्तार बोलत होते. खासदार इम्तिजाय जलील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. कार्यक्रमाला माजी महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख, माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, जमीर कादरी आदींची विशेष उपस्थिती होती.

सत्तार म्हणाले, ‘राज्यातील सरकार बदलले तरी मी काही वर्षांपासून सत्तेत आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये मी कॅबिनेट मंत्री होतो, आता राज्यमंत्री आहे. अशोक चव्हाणांचेही तसेच आहे. ते मुख्यमंत्री होते, आता मंत्री आहेत.’

संभाजीराजेंचं आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन; ५ हजार तरुण मुंबईकडे रवाना
इम्तियाज जलील यांचा उल्लेख करून सत्तार म्हणाले, ‘मी नेहमी सत्तेत आहे, जलील मात्र विरोधी पक्षात आहेत. विरोधी पक्षात असताना ते आमदार आणि नंतर खासदार झाले. सत्तेच्या रेसमध्ये असलेल्या अनेकांचे घोडे त्यांनी लंगडे केले. स्वत: मात्र लंगड्या घोड्यावर स्वार होऊन रेस जिंकली. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी गेल्या काही वर्षात जेवढा निधी मिळाला नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहरासाठी दिला. त्यांचे या शहरावर विशेष लक्ष आहे.’ वंदेमातरम सभागृह, हज हाउस, मौलाना आझाद संशोधन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या कामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले. सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अच्छे दिन आये है, आगेभी रहेंगे

खासदार इम्तिजाय जलील या वेळी म्हणाले, ‘पाच-सात वर्षांच्या काळात औरंगाबादमध्ये विकासाची कामे होत आहेत. औरंगाबाद शहराचे अच्छे दिन आले आहेत. अब्दुल सत्तार यांचा आशीर्वाद असाच कायम राहिला, तर २०२४नंतर देखील ‘अच्छे दिन’ कायम राहतील. नेहरू भवनच्या नवीन बांधकामासाठी प्रशासनाने अठरा महिन्यांचा अवधी दिला असला, तरी दोन वर्षांत हे बांधकाम पूर्ण होईल. या कामासाठी केंद्र सरकारचा निधी मिळवण्याचादेखील प्रयत्न केला जात आहे. अब्दुल सत्तार यांनी वंदेमातरम सभागृह, हज हाउसच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. या दोन्ही वास्तूंची कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत, निधी अभावी दहा टक्के काम रखडले आहे.’ मौलाना आझाद संशोधन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे नूतनीकरण करण्यासाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी सत्तार यांच्याकडे केली.

उद्धव ठाकरेंनी मला सवलत दिली

औरंगाबादचा उल्लेख शिवसेनेचे नेते, मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते संभाजीनगर असा करतात. अब्दुल सत्तार यांनी मात्र औरंगाबाद असाच उल्लेख केला. ‘औरंगाबाद-संभाजीनगर अशा वादात मी पडू इच्छीत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला औरंगाबाद म्हणण्याची सवलत दिली आहे, त्यामुळे मी औरंगाबादच म्हणणार,’ असे सत्तार या वेळी बोलताना म्हणाले.

मनसेचा १६वा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर होणार, राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here