पालघर जिल्ह्यातील रोशनी राजू, निकिता शर्मा, महिमा थापलियाल, झेनल कोथवा हे बोइसर येथील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. याशिवाय मयूरेश पाटील, प्रिन्सि रोड्रिग्स, रिद्धी कुलकर्णी (सर्व राहणार वसई) , सत्यम चव्हाण, शुभम पालवी (विक्रमगड), जोहा फिरोज शेख, सेजल लोखंडे, देवार्षी गायकर (वाडा) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे १२ विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितला. आपण राहत असलेल्या ठिकाणी कोणत्याही क्षणी बॉम्बचा वर्षाव होऊन काहीही घडू शकतं. पिण्यासाठी पाणी व अन्नाचा साठा मर्यादित असल्याने उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे व्यक्त केली आहे. दरम्यान, सध्याची परिस्थिती बघता हे सर्व विद्यार्थी आणि नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सत्यम रामू चव्हाण हा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तो तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याच्यासारखे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. ते विद्यार्थी ज्या अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत, तो परिसर प्रचंड भीतीच्या छायेखाली आहे. आम्ही सर्व जण सतत प्रचंड तणावाखाली आहोत, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पालघर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक स्वतंत्र मोबाइल क्रमांक व ई-मेल सेवा सुरू केली असून या हेल्पलाइनच्या मार्फत संबंधित पालक आणि अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांशी मोबाइलवरून संपर्क साधला आहे. या सर्वांची माहिती राज्य सरकारला कळवण्यात आली असून, राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याचे पालघरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले.