महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये महाराष्ट्राचे बरेच विद्यार्थी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत खूपच सकारात्मक भूमिका घेतली असून, सर्वांनाच मायदेशी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्याकडून एअर इंडियाचे विमान रवाना झाले आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येईल. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना कुठलेही बंधन असणार नाही. ज्यांचे झाले नसेल, त्यांची मोफत चाचणी करण्यात येईल. त्यांना क्वारंटाइन केलं जाणार नाही. त्यांच्या घरी राहू दिलं जाईल. त्यांची मानसिक अवस्था कशी असेल? ते प्रचंड घाबरले असतील. त्यांना ‘वेलकम’ करणे, त्यांना आल्या आल्या जेवण, स्नॅक्सची आवश्यकता असेल तर ते देणे आदी तयारी महापालिकेने केली आहे. त्यांना प्रसन्न वाटावं म्हणून गुलाबाचे फुल वगैरे देऊन स्वागत केले जाईल. मुंबईतून ते कुठे जाणार आहेत ? त्यांची माहिती घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवलं जाईल.’
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे रेस्क्यू ऑपरेशन
शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना रस्तेमार्गे युक्रेनमधून बाहेर काढून रोमानियाला घेऊन येण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. युक्रेनमध्ये राहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी तेथील भारतीय दूतावास प्रयत्नशील आहेत. अखेर युक्रेनमधून पहिल्या टप्प्यात ३०० विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशात आणण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपले पालक आणि भारत सरकारकडे मदत मागितली जात आहे.