करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनाबरोबरच इतर अनेक विषयांवर भाष्य केलं. ‘लोकांमध्ये अनेक बाबतीत सध्या संभ्रम आहे. लॉकडाऊननंतर पुढं नेमकं काय होणार आहे, हे कोणालाही माहीत नाही. हा संभ्रम संपवणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे. त्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करायला हवं होतं. जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व डॉक्टरांना मुस्लिम समाजातील काही लोक त्रास देताहेत. त्यांच्यावर हल्ले करताहेत. याबद्दल सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत. हे नेमकं काय चाललंय यावर मोदींनी बोलायला हवं होतं,’ असं राज म्हणाले.
मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला राज यांनी थेट विरोध केला नाही. ते म्हणाले, ‘पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार लोक दिवे पेटवतीलही. नाहीतरी लोकांना सध्या काही काम नाही. त्यात श्रद्धा असू शकते आणि दिवे लावल्यामुळं करोनावर काही परिणाम झाला तर चांगलंच आहे. पण, पंतप्रधानांच्या भाषणातून काहीतरी आशेचा किरण दिसायला हवा होता,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वाचा:
‘लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या’
‘सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक जबाबदारी समाजाची आहे. केवळ यंत्रणांना दोष देऊन चालणार नाही. लोकांनी लॉकडाऊनचं पालन करणं गरजेचं आहे. लोकांनी शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊन वाढू शकतो. त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारलही त्याला तोंड देणं कठीण होऊन बसेल,’ अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
हल्ली सगळेच डॉक्टर झालेत
‘हल्ली सगळेच डॉक्टर झालेत. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा. लोकांना कसलंही गांभीर्य नाही. तुम्हीच सगळं करणार असाल तर राज्यातले डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी इतकी मेहनत का करताहेत, असा सवालही राज यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times