आज, म्हणून ‘अमृतातेही पैजा जिंके..’ ऐसी अक्षरे रसिके.., लाभले भाग्य आम्हास.. इत्यादी शब्दांचे पोकळ बुडबुडे फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर मनसोक्त उडवून मराठी भाषेचा गौरव (वगैरे) करुन एक सामाजिक कर्तव्य इमाने इतबारे पार पडेल. पण पुढे भाषेचे काय होणार? मराठी भाषेची अवस्था वाईट आहे म्हणून तर आपण दिन साजरा करतो आहोत.. मग ‘लाभले आम्हास भाग्य.. बोलतो मराठी…’ हा दांभिकपणा पणा कशासाठी ? इंटरनेट आणि मोबाइल फोन्समुळे अवघे जगच मुठीत आले आहे. दर चार कोसावर भाषा बदलते म्हणतात. (आज सारं जग ‘ग्लोबल व्हिलेज’ झालं असताना तशी ती बदलते की नाही ते माहीत नाही). महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील लोक मराठीमिश्रीत कन्नड किंवा कन्नडमिश्रीत मराठी बोलतात. तर महाराष्ट्र आंध्र सीमेवरील लोक तेलगूमिश्रीत मराठी बोलतात. (गुजरात आणि उत्तरप्रदेश-बिहार तर महाराष्ट्रातच असल्यासारखी परिस्थिती आहे) या सगळ्या भाषिकांच्या बोलींचा, लहेजांचा, उच्चारांचा मराठीवर प्रभाव पडणे अगदी स्वाभाविक व रास्त आहे. ज्या शब्दांना चपखल प्रतिशब्द नाही किंवा आहे पण तो दुर्बोध आणि क्लिष्ट आहे (उदा. इंटरनेट, सॉफ्टवेअर, व्हायरस) अशा वेळी इंग्रजी शब्दांचा वापरही समर्थनीय आहे. मुद्दा आहे तो मराठी भाषा अशुद्ध बोलण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने लिहीण्याचा. कुठल्याही बोली भाषा आणि लिखीत भाषा यात फरक असतो हे मान्य आहे. (जगमान्य अशा इंग्लीशमध्येही तो आहे) बोली हा अनौपचारिक तर लिखित हा औपचारिक संवाद आहे. त्यामुळे लिहिताना ती व्याकरणाचे (विरामचिन्हांचेही) सर्व नियम पाळूनच लिहिली गेली पाहिजे. भाषा बदलेल.. बोली बदलेल.. लहेजा बदलेल. शब्दोच्चार बदलतील, पण शब्दांचे लिखाण आणि त्यांचे अर्थ तर बदलणार नाहीत ना ? उदाहरणच पहायचं तर हिंदीच्या प्रभावामुळे लोक व्यग्र ऐवजी सर्रास व्यस्त म्हणू लागले आहेत, पण मराठीमध्ये व्यस्तचा अर्थ वेगळा (‘सम’च्या विरुद्ध) आहे हे त्यांच्या गावीच नसतं. हिंदी चित्रपट व मालिकांमुळे हिंदी शब्दांचा, वाक्प्रयोगांचा खूपच प्रभाव विशेषत: तरुण मुला-मुलींच्या बोलण्यावर दिसून येतो. एका मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला विचारलं, कोणती साडी नेसू गं मी ? धाकटी उत्तरली, ती पिवळीवाली नेस ना, छान दिसेल. इथे नुसतं ‘पिवळी साडी नेस’ एवढं पुरेसं होतं, पण डोक्यात हिंदीतलं ‘पिलीवाली..’ असल्यामुळे पिवळीवाली झालं. तोच प्रकार ‘खूप सारे..’चा ! हिंदीतलं ‘बहोत सारे..’ मराठीत ‘खूप सारे..’ होऊन येतं. मराठीत नुसतं खूऽप म्हटलं तरी पुरेसं असतं, त्यापुढे सारे जोडण्याची गरजच नाही. माहित होणे ऐवजी (‘मालूम पडना’ च्या प्रभावामुळे) सर्रास माहित पडणे म्हटलं जातं. (पण ‘मालूम पडना’ हेही अशुद्धच आहे. मालूम होना बरोबर) मराठी भाषा ही मराठी शैलीतच बोलली गेली पाहिजे व हिंदी हिंदीच्या लहेजामध्ये. इथे नेमकं उलट होतं-मराठी बोलली जाते हिंदी स्टाइलमध्ये व हिंदी बोलली जाते मराठी स्टाइलमध्ये! वृत्तपत्रे जो मजकूर छापतात तो आजही प्रमाण मानला जातो. अनेकदा बातमी रंगतदार करण्यासाठी अकारण हिंदी शब्दांचा आधार घेतला जातो. उदा. ‘पोलीसांनी गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला’, ‘तहसिलदाराला लाच घेताना रंगे हाथ पकडले’ हे मथळे आपण नेहमी वाचतो. खरं तर इथे पोलीसांनी गुन्हेगारी टोळीची कृत्ये उजेडात आणली वा तहसिलदाराला लाच घेताना पकडले या वाक्यातून उचित अर्थबोध होतोच की ! (पण त्यातून ‘रेड हँडेड’ पकडल्याचा फील येत नसावा). एखाद्या कार्यक्रमाला, सभेला खूप लोक हजर होते हे सांगताना शंभरातले नव्वद लोक ‘खूप लोकं हजर होती’ असंच म्हणतात. लोक हा शब्दच अनेकवचनी आहे (जसा इंग्लीशमध्ये मॉब) हे लक्षातच घेतलं जात नाही. (इंग्लीशमध्ये लिहीतानाही अनेक जण चिल्ड्रेन्स, पीपल्स अशी अनेकवचनं लिहीतात) ‘तो म्हणाला’ ऐवजी ‘तो म्हटला’, ‘तो म्हणला’ असं बोललं, लिहीलं जातं. याहून गंमत म्हणजे, ‘लिहीलं जातं’, ‘बोललं जातं’ केलं जातं ऐवजी तर लिहील्या जाते, बोलल्या जाते, केल्या जाते असं विचित्र लिहीलं जातं. मी गेली.. मी आली, मी बसली, मी बोलली हे तर अगदी सर्रास ! भल्याभल्यांना कार्यवाही आणि कारवाई यातला फरक कळत नाही, त्यामुळे जिथे कार्यवाही करायची तिथे कारवाई आणि जिथे कारवाई करायची तिथे कार्यवाही करतात. तीच बाब सहकार्याने आणि सहकार्याने या शब्दांची. सहकारी आणि सहकार्य हे दोन वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत हे यांना कोण सांगणार? ज्येष्ठ कधी म्हणायचं आणि वरिष्ठ कधी म्हणायचं हे अनेकांना कळत नाही आणि मग जिथे ज्येष्ठ म्हणायचं तिथे वरिष्ठ म्हटलं जातं, वरिष्ठ म्हणायचं तिथे ज्येष्ठ म्हटलं जातं. ज्येष्ठ म्हणजे वडीलधारा, वयाने मोठा, अनुभवी. उदा. ज्येष्ठ संगीतकार, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ बंधू, तर वरिष्ठ हा शब्द हुद्दा दर्शविणारा आहे. जसे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. पण हा फरक लक्षात न घेता वरिष्ठ नागरिक, वरिष्ठ लेखक, वरिष्ठ अभिनेते असे तारे तोडले जातात. एखादा कोट्या करण्यात तरबेज असेल तर त्याला खुशाल कोट्याधीश म्हणा, मात्र खिशात कोटी रुपये असणार्याला कोट्याधीश न म्हणता कोट्यधीश म्हणायला हवं. वादळ, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे जो माजतो तो हाहाकार. हाहा:कार नाही ! लवकर हा शब्द काही जण लौकर आणि हाऊसिंग हा शब्द हौसिंग असा लिहीतात. मग त्याच न्यायाने अवघड हा शब्द औघड किंवा गवताळ हा शब्द गौताळ असा का लिहीत नाहीत ? सुरुवात हा शब्द जसा सुरवात असा चुकीचा लिहीला जातो तसेच आपले रोजचे गुरुवार, शनिवार हे वारदेखील गुरवार, शनवार असे चुकीचे लिहीले जातात. वाहन हा आणखी एक चुकीचा लिहीला जाणारा शब्द. ‘वाहन’चे वहान(ण) झाले की त्याची चप्पल होते हे लक्षात घ्यायला नको का ? अजस्र, चतुरस्र, स्रोत, हिंस्र्र, सहस्र, सहस्रबुद्धे या सर्व शब्दांमध्ये स्र आहे स्त्र नाही, तरीही लहानपणापासून स्र ऐवजी स्त्र वापरण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की या सर्व ठिकाणी स्त्र च लिहीला जातो. सहस्रबुद्धे या आडनावाच्या कितीतरी जणांना (आणि हे सर्वच जण उच्चशिक्षित होते बरं !) मी सांगितलंय-‘तुम्ही सहस्रबुद्धे आहात, सहस्त्रबुद्धे नाही !’ हृषीकेश हा शब्द अनेकदा अज्ञानामुळे ऋषिकेश असा लिहीलेला आढळतो. हृषीकेश’ची हृषीक +ईश अशी ङ्गोड आहे. हृषीक म्हणजे ज्ञानेंद्रिय व ईश म्हणजे ईश्वर, तसा ऋषिकेश या शब्दाला ‘ऋषीचे केस’ या शब्दाखेरीज कुठलाही अर्थ नाही आणि मला वाटतं, ऋषिकेश नाव धारण करणार्याला हा अर्थ नक्कीच अभिप्रेत नसावा. एखादी व्यक्ती जिवंत असताना तिच्या जन्मदिवसाला एकवेळ वाढदिवस म्हणणे योग्य, पण काही महाभाग त्या व्यक्तीच्या निधनानंतरही त्याचा जन्मदिवस साजरा करताना वाढदिवस असे संबोधतात. ज्याची वाढ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याचा कसला वाढदिवस ? इंग्लीशमधला ‘बर्थडे’ आणि मराठीत जन्मदिन हा शब्द खरा योग्य शब्द आहे. अवतरण चिन्हांच्या दुरुपयोगाइतकं दुरुपयोगाचं दुसरं उदाहरण शोधून सापडणार नाही. काही मंडळींना असं वाटतं की एखादी गोष्ट हायलाइट करायची असेल तर अवतरण चिन्हे वापरायची असतात. उदा. आमच्या घराची ”वास्तुशांती” … या दिवशी आयोजित केली आहे. अलिकडे लोक, विशेषत: तरुण पिढी इंग्रजी शब्दांमध्ये स्त्री लिंग-पुल्लिंग-नपुसकलिंगांचा मोठाच घोळ घालते. ते विंडचीटर, ते पेन ऐवजी तो पेन असं संबोधलं जातं. उद्या याच धर्तीवर ती खुर्ची ऐवजी ते खुर्ची ते टेबल ऐवजी तो टेबल असंही संबोधलं गेलं तर आश्चर्य वाटायला नको ! ते कशाला, अनेक महाभाग ‘पेन भेटला का ?’ पुस्तक भेटला का ?’ अशी पृच्छा करताना दिसतातच. नेहमीच्या वापरातले काही शब्द कसे चुकीच्या पद्धतीने वापरले जातात पहा.. दोन रिक्षावाले एकमेकांशी बोलत असतील तर ‘आज सक्काळी सक्काळीच मी चार भाडी ‘मारली’ !’ हा संवाद तुम्हाला नक्की ऐकू येईल. माशी मारली.. कानफटात मारली तशी भाडी मारली ? चला, एकवेळ ते ठीक आहे.. रिक्षावाल्यांकडून तुम्ही शुद्ध मराठीची अपेक्षा करु शकत नाही, पण ‘मारणे’ हे क्रियापद कानफटात मारणे, माशी मारणे आणि थाप मारणे याव्यतिरिक्त आणखीही अनेक बाबतीत वापरले जाते. प्रिंट मारली. (प्रिंट काढली, प्रिंट घेतली हे शब्द माहीत नसतील काय यांना ?) किंवा 50 रुपयांचा रिचार्ज ‘मारला’. (रिचार्ज केला हा शब्दप्रयोग ते मोबाइलच्या बॅटरी रिचार्जसाठी वापरत असतील). ‘त्याने काय भारी जोक ‘मारला’ ! (जोक सांगणे त्यांना फार मुळमुळीत वाटत असावे). मला सांगा, यात मारण्याची क्रिया कुठे होते हो? ‘मला श्रीखंड भयंकर आवडतं..’ ‘त्याला क्रिकेटचे भयंकर वेड आहे..’ ‘त्याला दीपिका भयंकर आवडते..’ हे शब्दप्रयोग इतके सहज आणि सर्रास वापरले जातात की त्यात काही चुकीचे, वावगे आहे हे कुणाच्या ध्यानातच नसतं. भयंकरचा इंग्लीश अर्थ हॉरिबल असा आहे. मुळात भयंकर या शब्दात ‘भय’ आहे हे तरी लक्षात घ्याल की नाही ? श्रीखंड, क्रिकेट आणि दीपिकामध्ये काय भय वाटावं असं भयंकर काय आहे ? परोक्ष आणि अपरोक्षचा गोंधळ शंभरातले 96 जण करतात. परोक्ष म्हणजे डोळ्यांआड अथवा पाठीमागे आणि अपरोक्ष म्हणजे नजरेआड नाही असा म्हणजेच डोळ्यासमोर. असा अर्थ असताना परोक्ष या अर्थाने अपरोक्ष हा शब्द सर्रास वापरला जातो, लिहीला जातो. सयुक्तिक आणि संयुक्तिक हे असेच दोन हमखास चुकीचे लिहीले जाणारे शब्द. ‘तुझं हे बोलणं काही मला सयुक्तिक म्हणजे (रास्त, युक्तिपूर्ण /लॉजिकल) वाटत नाही !’ असं जेव्हा त्यांना म्हणायचं असतं तेव्हा शंभरातले 96 जण ‘तुझं हे बोलणं संयुक्तिक नाही. असंच म्हणतात. वास्तविक संयुक्त हा शब्द आपण ‘दोघा वा अनेकांनी मिळून’ या अर्थाने नेहमीच वापरत असतो. रफार कोणत्या अक्षरावर द्यायचा याबाबत अनेकांच्या मनांत गोंधळ असतो. मग अपर्णा ऐवजी अर्पणा लिहीलं जातं किंवा पुनर्मुद्रण’ ऐवजी ‘पुर्नमुद्रण’ असं अशुद्ध छापलं जातं. सगळीकडे अस्संच आहे.. काहीही बोला.. कसंही बोला.. समोरच्याला आकलन होतंय ना.. बस्स ! भाषेची, शब्दांची, शब्दरचनेची, वाक्यरचनेची ऐशी तैशी ! आणि मारे अभिमानाने म्हणायचं.. ‘लाभले भाग्य आम्हां बोलतो आम्ही (चुकीचे) मराठी ! गेल्या दहा-पंधरा वर्षात सोशल मिडीयाच्या रुपात तर नवलेखकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. तिथली तर्हा तर अगदी वेगळी.. सोशल मिडीयावर विराम चिन्हांचा वापर जणू निषिद्धच असावा अशी परिस्थिती आहे. स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह या सगळ्या चिन्हांसाठी इथे केवळ एकच चिन्ह वापरलं जातं, ते म्हणजे टिंब टिंब.. (त्याला पूर्णविराम म्हणतात असं कोण ते पुटपुटलं?) एखादी कविता असेल तर पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत प्रत्येक ओळीच्या शेवटी टिंब टिंब.. कविता संपल्यावरसुद्धा टिंब टिंबच ! काहीतरी अर्धवट आहे, अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी खरं तर टिंब टिंब.. वापरायची असतात. तरी बरंय की लेखनात विरामचिन्हे किती महत्वाची असतात आणि ती वापरली नाहीत तर अर्थाचा कसा अनर्थ होतो हे अधोरेखित करणारे डझनभर जोक्स हीच मंडळी (याच टिंब टिंबांच्या भाषेत) इकडून तिकडे करीत असतात. आपली मराठी भाषा आपणच जपायची आहे, शुद्ध ठेवायची आहे. आपण शुद्ध आणि योग्य मराठी बोललो तरच आपली मुले शुद्ध आणि योग्य मराठी बोलतील. आणि मग मराठी भाषा दिन ‘साजरा करण्याची’ वेळही आपल्यावर येणार नाही. – जयंत टिळक
मटा संवादः बोलतो 'मराठी'?
जयंत टिळक