म. टा. वृत्तसेवा, वसई

पूर्व मनवेलपाडा येथे बांधकाम व्यावसायिक समय चौहान यांच्यावर शनिवारी दुपारी दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यात चौहान यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून विरार पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांचाही समावेश आहे.

चौहान यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ शशिकांत चौहान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे दोन्ही आरोपी फरार आहेत. मात्र सात जणांनी या गोळीबाराचा कट रचल्याचा आरोप शशिकांत यांनी तक्रारीत केला आहे.

एका इमारतीच्या बांधकामावरून चौहान आणि या सात जणांमध्ये १० वर्षांपासून वाद होते. यातून गेल्यावर्षी त्यांचा सहकारी निशांत कदम याचा खून झाला होता. या हत्येचा आरोप चौहान यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आपल्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे त्यांनी भाऊ शशिकांतला सांगितले होते. त्यामुळे हा गोळीबार या कटाचाच भाग असल्याचा शशिकांत यांचा आरोप आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी चौधरी यांनी नुकताच बहुजन विकास आघाडीमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here