पिंपरी चिंचवड : राज्यभरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र याच संपाच्या काळात काही कर्मचाऱ्यांनी आपला जीवही गमावला आहे. अशातच पिंपरी-चिंचवड शहरातही एक दुर्दैवी घटना घडली असून एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. (St Employee Commits Suicide)

वल्लभनगर आगारतील संजय सरवदे (वय ४३) यांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याचं उघड झालं. आर्थिक कारणांमुळे आलेल्या नैराश्याला कंटाळून संजय सरवदे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. संजय सरवदे हे एसटी बस चालक म्हणून काम करत होते आणि संपात सहभागी झाले होते.

Ajit Pawar : संभाजीराजेंचे मुंबईत उपोषण, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

‘काही दिवसांपूर्वी सरवदे यांच्या घराचे वीज कनेक्शन कापण्यात आले होते. तसंच किराणा दुकानदार आणि इतर लोक उधारीमुळे त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावत होते. या सर्व कारणांतून त्यांनी आत्महत्या केली आहे,’ अशी माहिती सरवदे यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. तसंच या हत्येला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोपही सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

संजय सरवदे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

दरम्यान, संप सुरू झाल्यापासून आत्महत्या, हृदयविकाराचा झटका अशा विविध कारणांमुळे एसटी कर्मचारी जीव गमावत आहेत. कर्मचाऱ्यांच्या जाण्याने त्यांची कुटुंबेही उघड्यावर पडत आहेत. तसंच जे कर्मचारी संपात सहभागी आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here