पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजासह ओबीसी व धनगर समाजाची मोठी फसवणूक केली. या सरकारवर कोणत्याही समाजघटकांचा आता विश्वास राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर १७ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही. याचा निषेध म्हणून खासदार संभाजीराजे यांना आझाद मैदानवार उपोषणाला बसण्याची वेळ आली. मराठा समाजातील तरूणांच्या हितासाठी वारंवार केलेल्या मागण्यांवर सरकारने फक्त आश्वासने दिली. या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारमधील एकही मंत्री बोलायला तयार नाही. शिवसेना मराठी माणसाचा कैवार घेऊन राजकारण करते, मात्र त्यांनीच मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले. मराठी माणसाचा अवमान त्यांनी केला आहे,’ असा आरोपही विखे पाटील यांनी केला.
‘समाजातील तरुण शांत तरी किती काळ बसणार?’
‘सारथी संस्थेच्या बळकटी करणासाठी शासन कोणतीही तरतूद करू शकलं नाही. आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या दृष्टीने निर्णय होत नाही. आरक्षणाच्या कोट्यातून नोकरीसाठी प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना सरकार अद्यापही नियुक्त पत्र देवू शकले नाही. त्यामुळे समाजातील तरुण शांत तरी किती काळ बसणार? समाजाच्या याच भावना लक्षात घेऊन संभाजीराजेनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,’ असंही विखे पाटील म्हणाले.