पीडित मुलीचे तिच्या मामासह इतर नातेवाईकांनी जामनेर तालुक्यातीलच एका तरुणासोबत ६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेला घेऊन तरुण जळगावात आला आणि याठिकाणी दोघेही शनिपेठ परिसरातील एका भागात भाड्याच्या खोलीत राहात होते. यादरम्यान तरूणाने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी ८ फेब्रुवारी रोजी तिच्या आजीकडे इंदौरला जाण्यासाठी निघाली. मात्र या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तिला तिच्या आजीचे घर माहीत नसल्याने ती पोलिसांकडे गेली. तेव्हा सदर मुलगी अल्पवयीन असून घरातून पळून आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
पोलिसांनी पीडित मुलीला इंदौर येथील बालकल्याण समितीसमोर हजर केले. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी जळगाव पोलिसांनी मुलीला इंदौर येथून ताब्यात घेत जळगावात आणले. मुलगी अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावला आणि यात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून ती ३ महिन्यांची गरोदर राहिल्याने याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन २६ फेब्रुवारी रोजी शनिपेठ पोलिसात मुलीची आई, मामा, चुलत मावशी, पती, सासरे, सासू तसंच तिच्या पतीचे मामा या ७ जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार, बालविवाह या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पो.नि. बळीराम हिरे हे करत आहेत.