poland help to indian students: युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना पोलंडची अशीही मदत… – poland to allow indian students fleeing ukraine to enter without any visa restrictions
नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी पोलंडने त्यांना विनाव्हिसा प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती येथील पोलंडच्या दूतावासाने रविवारी दिली. पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोवस्की यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, की रशियाच्या आक्रमणामुळे युद्धग्रस्त झालेल्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी पोलंडने विनाव्हिसा प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे.
युक्रेन सोडून जाणाऱ्या एका मल्याळी विद्यार्थ्याला युक्रेन सैन्यातील सैनिकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलंड- युक्रेन सीमेवर अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याची माहिती समोर येत आहे.
मारहाण झालेला मल्याळी विद्यार्थी एंजल याने एका व्हिडिओ क्लिपद्वारे ही माहिती जगासमोर आणली आहे. ‘कित्येक तास कित्येक किलोमीटरचा प्रवास चालत करून आम्ही पोलंड आणि युक्रेनच्या सीमेवर आलो. इथे मलाही युक्रेनच्या सैनिकांनी मारहाण केली आहे आणि रस्त्यावर ढकलून दिले आहे. माझ्या एका मित्राने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही मारहाण करण्यात आली,’ असे एजंलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांकडे अत्यल्प अन्न आणि पाणी उरले आहे, असेही एजंलने सांगितले आहे.