वासू (अंकुश चौधरी) हा चित्रपटाचा नायक आहे. वासूच्या वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरच त्याचं लग्न झालं आणि मधुचंद्रही पार पडला, तर त्याचा भाग्योदय असल्याचं त्याला एका ज्योतिषाकडून सांगितलं जातं. प्रत्येक गोष्टीत सातत्यानं सुरुवातीला काही ना काही अडचणी येणाऱ्या वासूच्या आयुष्यात ही गोष्ट तरी योग्य पद्धतीनं पार पडते की नाही, या विचारात वासू आहे. सपनाबरोबर (प्राजक्ता माळी) त्याचं लग्नही होतं आणि एका मोठ्या कुटुंबासह त्यांचा संसार सुरू होतो. लग्न, त्यानंतरचे सर्व विधी-सोपस्कार पार पाडल्यानंतर ‘संधी’ मिळणार आणि आपला भाग्योदय होणार, अशी आशा वासू लावून बसला आहे. या वासूसाठी अतिशय ‘महत्त्वाच्या’ क्षणी देशात लॉकडाउनची घोषणा होते आणि वासूचे सर्व कुटुंबीय त्याच घरात अडकून पडतात. या परिस्थितीत जोडप्याला एकांत मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. त्यांना ती ‘प्रायव्हसी’ मिळते का? आणि या लॉकडाउनच्या काळात एका घरात काय-काय गमतीजमती घडतात? अपेक्षित ध्येय साध्य होतं का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘लकडाउन’ पाहायला हवा.
चित्रपटाची गोष्ट तशी फ्रेश आणि वेगळी आहे. मात्र, लॉकडाउनच्या विशिष्ट निर्बंधांमुळे या गोष्टीला बाहेरचं अवकाश नाही. एका मर्यादित ‘पीच’वरच लेखक-दिग्दर्शकाला खेळायचं आहे. एका अर्थानं हे या कथेचं बलस्थान आहे, असं आपण गृहित धरलं तर हेच बलस्थान सिनेमाच्या आशय-विषयाची मर्यादाही आहे. लॉकडाउनच्या काळात या घरात घडणाऱ्या गमतीजमतींनी बऱ्यापैकी टाइमपास होतो. या घरातील एक एक अतरंगी नग, त्यांची लुडबुड, वासू-सपनाला एकांत मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडी असं सारं काही चित्रपटात आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांची कथा-पटकथा निश्चितच गोळीबंद आहे. संवादही खटकेबाज आहेत. काही ठिकाणी व्यक्तिरेखा उलगडून सांगण्यात आलेल्या नाहीत; तसेच घरातील विशिष्ट व्यक्तिरेखांवरच अधिक प्रकाश टाकल्याचं जाणवत राहते. सारा खटाटोप मधुचंद्रासाठी असल्यानं त्यातील विनोदही सेन्सॉर असतील असं वाटलं होतं. मात्र, त्या अर्थानं चित्रपटाची भाषा फार कोठे घसरत नाही.
‘फॅमिली एंटरटेन्मेंट’चा टॅग लावूनही त्या अर्थानं हे मनोरंजन विशिष्ट वर्गासाठीच राहतं. अशा प्रकारच्या सिनेमाकडून तशा काही खूप ग्रेट अपेक्षा असतात अशातला भाग नाही; पण इथे अपेक्षाभंग होत नाही, हे मात्र सांगायला हवं. सिनेमाचा सगळा डोलारा कलाकारांच्या अभिनयावर पेलला जातो. अंकुश, प्राजक्ता यांचा अभिनय नैसर्गिक आहे. त्यांची केमिस्ट्री उत्तम आहे. शुभा खोटे, संजय मोने, आनंद इंगळे, प्रिया बेर्डे, रुचिरा जाधव, समीर खांडेकर, स्नेहा रायकर हे कलाकारही आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. चित्रपटाच्या शेवटी येणारा ‘जिनपिंग गोंधळ’ एकदम भन्नाट आहे. थोडक्यात काय तर ‘लकडाउन’ हा बऱ्यापैकी टाइमपास करणारा सिनेमा आहे. फार विचार न करता, सहज जाता जाता टाइमपास हवा असेल, तर हा सिनेमा एक पर्याय असू शकतो.
निर्माते : शरद सोनावणे, सागर फुलपगार, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी
दिग्दर्शक : संतोष मांजरेकर
पटकथा : रवींद्र मठाधिकारी, संतोष मांजरेकर
गीते : रवींद्र मठाधिकारी, मंदार चोळकर
संगीत : अविनाश-विश्वजित
कलाकार : अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, शुभा खोटे, प्रिया बेर्डे, संजय मोने, आनंद इंगळे, संजय खापरे, वनिता खरात, , सुनील गोडबोले
दर्जा : तीन स्टार