जळगाव :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेत विविध ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. अशातच जळगावमध्ये राज्यपाल कोश्यारी यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (Governor Bhagat Singh Koshyari)

राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आकाशवाणी चौकात आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. मात्र आंदोलनापूर्वीच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून शहरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

“महाराष्ट्राला असे राज्यपाल नको ज्यांना शिवाजी महाराज कळाले नाहीत, त्यांची तात्काळ उचलबांगडी करा”

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात समर्थ साहित्य परिषदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात गुरूचं महत्व सांगताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज काय असते? समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते.’

दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here