अहमदनगर : राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांच्या पाठीमागे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच अटक केलेली असताना आता आणखी एका मंत्र्याला ईडीने दणका दिला आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (NCP Prajakta Tanpure) यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची तब्बल १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

संजय पांडे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त, हेमंत नगराळेंना सुरक्षा महामंडळाची जबाबदारी

तनपुरे यांची कोणती मालमत्ता जप्त झाली?

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ९० एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. तसंच इतर ४.६ एकर जमीनही जप्त करण्यात आली आहे. हा साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून नाममात्र दरात तनपुरे यांच्याशी संबंधित कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईने राष्ट्रवादी हैराण

केंद्रातील विविध तपास यंत्रणांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही महिन्यांपासून अटकेत आहेत. तसंच नवाब मलिक यांच्यावरही काही दिवसांपूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली असून ते ईडी कोठडीत आहेत. त्यानंतर आता कारवाई झालेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे, तसंच ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जवळचे नातेवाईकही आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here