अहमदनगर : काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज शिर्डीत पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसची परंपरा सांगत भाजपवर जोरदार टीका केली. तसंच यावेळी पाटील यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कौतुक करताना एक मोठं विधान केलं आहे. ‘थोरातांचे नेतृत्व लोकाभिमुख असून त्यांना देशपातळीवर मोठी मागणी आहे,’ असं एच. के. पाटील म्हणाले. (Congress Balasaheb Thorat)

या मेळाव्याला बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेसचे सचिव बी. एम. संदीप, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष चौधरी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला ईडीचा दणका; तब्बल १३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!
एच. के. पाटील नेमकं काय म्हणाले?

मेळाव्यात बोलताना एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, ‘थोरात यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात राबवलेली एक कोटी स्वाक्षरी मोहीम अत्यंत यशस्वी झाली होती. थोरात हे राष्ट्रबांधणी करणारे लोकाभिमुख नेतृत्व आहे. देशपातळीवर त्यांची मोठी मागणी आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह संपूर्ण देशामध्ये ते लोकप्रिय आहेत,’ असं पाटील म्हणाले.
…म्हणून संभाजीराजेंवर उपोषणाची वेळ आली; खासदाराचा घणाघात
भाजपवर हल्लाबोल

‘स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षानं राबवलेल्या विविध योजनांमुळं देश समृद्ध झाला आहे. मात्र ७ वर्षांपूर्वी सत्तेवर आलेला भाजपा सातत्यानं खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमानं काम करावं,’ असं आवाहन पाटील यांनी केलं.

माजी मंत्री पल्लम राजू म्हणाले, ‘काम कमी आणि जाहिरात जास्त असलेल्या भाजपा सरकारनं देशवासीयांना वाऱ्यावर सोडलं आहे. करोना संकटात केंद्र सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरलं असून भारतामध्ये मोठी आर्थिक मंदी आली आहे. राज्यामध्ये सूड बुद्धीनं महाविकास आघाडी सरकारविरुद्ध काम केलं जात आहे. या सरकारला अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव असून शेतकरी, कामगार, कष्टकरी या सर्वांच्या विरोधीत असणारा केंद्र सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत थोरात यांना मोठी ताकद द्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

‘जाती धर्माच्या नावावर मतं मागून सत्तेवर आलेले भाजपचं सरकार राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहात आहे. दिवंगत इंदिरा गांधींच्या काळातही पक्षाला संघर्ष करावा लागला. मात्र पुन्हा काँग्रेस पक्षानं भरारी घेतली. आता पक्षासाठी मंदी असली तरी नव्या कार्यकर्त्यांसाठी ही मोठी संधी आहे,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here