Mahashivratri 2022 : खरंतर जवळपास प्रत्येक राज्यातील गावांत आणि देशांत अनेक शिवमंदिरे आहे. परंतु, त्यातील काही महत्वाच्या प्रसिद्ध शिवमंदिरांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तर, काही निवडक शिवमंदिरांची माहिती खालीलप्रमाणे…
1. बाबुलनाथ, मुंबई
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे बाबुलनाथ. सुंदर मंदिर असलेल्यांपैकी एक हे देवस्थान मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तर हे मंदिर भक्तांनी संपूर्ण भरलेले असते. याशिवाय दर सोमवारी इथे शंकराच्या भक्तांची रांग लागलेली दिसून येते. हिंदू राजा भिमदेवद्वारे साधारण12 व्या शतकात या प्राचीन मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. काळानुसार यात बदल झाला असला तरीही पुरातन काळापासूनचे शिल्प आजही या मंदिरात आहेत. पूर्वी हे मंदिर पारशी लोकांच्या अखत्यारीत होते. साधारण 90च्या दशकात मुंबईतील सर्वात उंच मंदिर म्हणून बाबुलनाथ मंदिराची ओळख होती.
2. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, मुंबई
अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. हे अंबरेश्वर शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते आणि स्थानिक पातळीवर पुरातन शिवालय म्हणून ओळखले जाते. हे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून (पूर्व) 2 किमी अंतरावर वडवण (वालधुनी) नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर इ.स.1060 मध्ये बांधले गेले आहे. हे मंदिर दगडात सुंदर कोरलेले आहे. अंबरनाथचे हे शिवमंदिर शिलाहारकालीन असून ते संपूर्णपणे एका दगडात कोरण्यात आले आहे. त्यावर विविध प्रकारच्या लहानमोठय़ा अशा हजारो मूर्ती असून शिल्पकला, वास्तुकला आणि कोरीवकाम यांचा सुरेख संगम या मंदिराच्या बाह्य आणि अंतर्भागात पाहायला मिळतो. तर मंदिराचा गाभाराही तळघरात असून त्यासाठी काही पाय-या उतरून खाली जावे लागते. हे मंदिर संपूर्ण मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील सर्वात जुने मंदिर असून युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीतही या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.
3. सोमेश्वर मंदिर – नाशिक
सोमेश्वर मंदिर नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्यानजिक सुमारे 4 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी हे भगवान महादेवाचे मंदिर आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर आहे. या मंदिराखालून गुप्त गंगा वहात असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाली आहे. तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे. पुढे गंगापूरचा धबधबा असून त्याच्या पुढे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटींचा आश्रम व बालाजी मंदिर आहे.
4. कपालेश्वर मंदिर, नाशिक
कपालेश्वर मंदिर हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही. नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही.
5. कुणकेश्व मंदिर, देवगड कोकण
कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते. देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे. हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असावे, असे सांगितले जाते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे.
6. मार्लेश्वर मंदिर, संगमेश्वर
मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. देवरूख नगरापासून 18 किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून 16 कि.मी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. ह्या गुहेत दोन शिवपिंडी आहेत. त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर ह्या नावाने ओळखल्या जातात. असे सांगण्यात येते की, हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे.
महत्वाच्या बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha