नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव व राहुरी या भागात घडफोडीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. राम बाजीराव चव्हाण (वय २०, रा. आष्टी, जि. बीड), तुषार हबाजी भोसले, प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले, विनोद हबाजी भोसले (तिघेही रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आणखी दोघे फरारी आहेत. यातील तिघेही भोसले बंधू हब्या उर्फ हबीबची मुले आहेत. हब्याला कोठेवाडीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. शिक्षा भोगत असताना औरंगाबादच्या कारागृहात ५५ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या मुलांची टोळी जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे करत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक कार्यरत होते. त्या काळात कोठेवाडीतील आरोपींना अटक करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या पोलीस अंमलदार सुनील चव्हाण यांचाही या नव्या पथकात समावेश होता. अलिकडेच नगर तालुक्यातील चास गावात आरोपी राम चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी घरफोडी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.
आरोपी मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून नगरमध्ये येणार असल्याची समजल्याने पथकाने नगर-जामखेड रोडवरील आठवड घाट येथे सापळा लावून चार जणांना पकडलं. दोन साथीदार दुचाकी तिथेच सोडून पळून गेले. आरोपींकडून ४२ तोळे सोन्याचे दागिने आणि ३९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, तीन दुचाक्या असा २३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडून १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील आरोपी प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले याच्याविरोधात बीड जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी-कर्मचारी सोमनाथ दिवटे, सोपान गोरे, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप पवार, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरूंद, देवेंद्र शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.