कीव्ह, युक्रेन :

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा सहावा दिवस आहे. याच दरम्यान युक्रेनमध्ये युद्धभूमीत अडकून पडलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा‘ राबवण्यात येतंय. या मोहिमेतील ‘एअर इंडिया’चं सातवं विमान रोमानियाच्या बुखारेस्टहून तब्बल १८२ भारतीय नागरिकांना घेऊन मुंबईमध्ये दाखल झालंय. तर या मोहिमेतील आठवं विमान आज हंगेरीच्या बुडापेस्टहून नवी दिल्लीसाठी रवाना झालंय.

मायदेशी परतणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचं सांगत समाधान व्यक्त केलंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरित्या हंगेरीला हलवून मायदेशी पोहचवण्यासाठी करण्यात आलेल्या हालचालींबद्दल या भारतीयांनी दूतावास आणि भारत सरकारचे आभार मानलेत. ‘आम्हाला सुखरूप घरी परत आणण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Russian Military Convoy: युक्रेनला उद्ध्वस्त करणार? कीव्हच्या मार्गावर ६४ किमी लांब रशियन लष्करी ताफा
युक्रेनचा कडवा प्रतिकार; रशियासोबतच्या चर्चेत सैन्य मागे घेण्याची भूमिका
चर्चेतूनच उत्तर मिळेल, भारत आपल्या भूमिकेवर ठाम

रशिया युक्रेन युद्धादरम्यान थेट कोणतीही एक बाजू निवडण्यास भारतानं सुरूवातीपासूनच नकार दिलाय. या प्रश्नावर केवळ चर्चेतूनच उत्तर मिळू शकेल, अशी भूमिका भारतानं युक्रेन संकटावर बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रातही मांडली. या संकटावर केवळ राजनैतिक संवाद हाच उपाय असल्याचा पुनरुच्चार भारतानं केलाय.

‘युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारत अतिशय चिंतेत आहे. हिंसाचार त्वरित थांबवून शत्रुत्व संपवण्याचं आवाहन आम्ही करतो’, असं संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी म्हटलंय. दोन्ही बाजूंमधील मतभेद प्रामाणिक, गंभीर आणि शाश्वत संवादातूनच सोडवले जाऊ शकतात, असं म्हणत तिरूमूर्ती यांनी जगासमोर भारताचं म्हणणं मांडलंय.

चीनकडून आपल्या नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्न

दरम्यान, चीनकडूनही युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याची सुरुवात करण्यात आलीय. स्थानिक माध्यमांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगने आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढायला सुरुवात केली आहे. चीनचा मित्रदेश असलेल्या रशियाच्या आक्रमकतेमुळे चीनला आपल्या नागरिकांचीही सुरक्षा धोक्यात आल्याची भीती वाटतेय. यादरम्यान, रशियाच्या हल्ल्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या चीनच्या अनेक नागरिकांना चिडलेल्या युक्रेनवासीयांच्या विरोधालाही सामोरं जावं लागत असल्याचं चित्रं दिसून आलं.

Watch Video: युक्रेनमध्ये ‘जय जवान जय किसान’, शेतकऱ्यानं ट्रॅक्टरला बांधला शत्रुचा रणगाडा
Volodymyr Zelensky: बेलारूस चर्चेआधी युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या दोन मागण्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here