अहमदनगर : ‘ईडीने कारवाई केल्यानंतरही कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, असा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर कारवाई झाली, त्यावेळी विषय वेगळा होता. त्यामुळे तेव्हा देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ‘राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावरील कारवाईसंबंधी मात्र आपल्याला फारशी माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल आताच काही बोलता येणार नाही,’ असंही ते म्हणाले. (Hasan Mushrif In Ahmednagar)

नगर येथे जिल्हा आढावा बैठक झाल्यानंतर हसन मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला आहे. या अगोदरही हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं, तेव्हापासून ईडीमार्फत अशा प्रकारच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत, हे काही नव्याने सांगायला नको. आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते मग भाजपवाले काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, असा निर्णय महाविकास आघाडीच्याकडून घेण्यात आलेला आहे. ज्या वेळेला अनिल देशमुखांवर कारवाई झाली त्या वेळेला तो विषय वेगळा होता. जमीनसंबंधी मालिकांवर जे आरोप होते जुने आहेत. १० वर्षे भाजपची केंद्रात सत्ता होती व पाच वर्ष राज्यात सत्ता होती. त्यावेळी त्यांना हा गैरव्यवहार दिसला नाही का? फक्त महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले म्हणून अशा प्रकारच्या कारवाया सध्या सुरू आहेत. पण महाविकास आघाडी सरकार घट्ट आहे. आता अशा चौकशा झाल्याने आघाडी अधिक घट्ट होत आहे,’ असंही मुश्रीफ म्हणाले.

‘त्या वक्तव्याबद्दल राज्यपालांनी माफी मागण्याची गरज नाही, कारण…’

प्राजक्त तनपुरेंवरील कारवाईवर अधिक भाष्य टाळलं!

राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधी साखर कारखान्याची मालमत्ता कालच ईडीने जप्त केली आहे. त्यासंबंधी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘ईडीची कारवाई नगर जिल्ह्यापर्यंत आल्याची मला अद्याप पुरेशी माहिती नाही. मात्र, साखर कारखाने विक्रीचे अपसेट प्राईस ठरल्यावर आलेल्या निविदेतील मोठ्या रकमेची मान्य केली जाते, असा नियम आहे. मंत्री तनपुरे यांच्यावरील कारवाई संदर्भात नेमकं काय झालं, ते माहिती नाही. त्याची माहिती घेतो,’ असं सांगत मुश्रीफ यांनी यावर अधिक भाष्य टाळलं.

‘राज्यपालांनी माफी मागावी’

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास असल्याबाबत केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी ते विधान तत्काळ मागे घ्यावे आणि जनतेची माफी मागावी,’ अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराजांच्या संदर्भात यापूर्वीही अनेक वक्तव्य वेगवेगळ्या पद्धतीतून आली होती. त्याचा सर्वत्र निषेध झालेला होता. पण राज्याच्या राज्यपाल पदावरील व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करून एक प्रकारे अवमान केलेला आहे,’ अशा शब्दांत मुश्रीफ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here