सूर्यकांत आसबे | सोलापूर :

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी तत्काळ पुढाकार घेतला, ती तत्परता ते राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या बाबतीत घेऊ शकत नाहीत. कारण त्यांना मित्र पक्षांची नाराजी नको आहे आणि यातून आपली खुर्ची जाईल याची भीती त्यांना वाटत असून सत्तेसाठी उद्धव ठाकरे हतबल झाले आहेत,’ अशी टीका भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. (Pravin Darekar Criticises Uddhav Thackeray)

सोलापुरात मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. ‘देशद्रोही असणाऱ्या व्यक्तींसोबत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा संबंध आहे. या आरोपानंतर भाजपच्या नव्हे तर न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांना अटक केली आहे. मात्र मलिक यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी केविलवाणा प्रयत्न करत आहे,’ अशा शब्दांत दरेकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

‘…म्हणून भाजपची मलिकांविरोधात भूमिका’

प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना खळबळजनक आरोपही केले आहेत. ‘नवाब मलिक यांचे देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध आहेत, असा आरोप या तपास यंत्रणेने केला आहे. एका देशद्रोही व्यक्तीसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध ठेवणे हा देशद्रोह आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नवाब मलिक हटाव देश बचाव, अशी भूमिका घेत राज्यभर नारा दिला आहे. राज्य सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेणं गरजेचं असताना महाविकास आघाडीतील मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र भाजपा गप्प बसणार नाही. राजीनामा घेणारच आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

‘भाजप नेत्यांच्या चौकशीसाठी संजय राऊतांना पंतप्रधान कार्यालय कशाला हवे?’
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका

अनेक निष्पापांचा बळी घेणारा व बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपीशी व्यवहार करणे म्हणजे मोठा देशद्रोह असून मालिकांनी तो देशद्रोह केला आहे. हे सरकार त्याला मुस्लीम रंग देण्याचाही प्रयत्न करत आहे. शेतकरी कामगार आणि बेरोजगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायला वेळ नसलेल्या ठाकरे सरकारला देशद्रोही मालिकांच्या समर्थनार्थ आंदोलनास मात्र वेळ आहे. एसटी कर्मचारी संप इतके महिने सुरू असतानाही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचंही दरेकर म्हणाले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत भविष्यात युती होणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष पूर्ण भ्रष्टाचारी असल्यामुळे भाजपने जाहीर केलं आहे, तर मग भविष्यात या भ्रष्टाचारी पक्षांसोबत युती करणार का? या प्रश्नावर मात्र दरेकर यांनी सावध पवित्रा घेतला. मला वाटतं अशा भ्रष्टाचारी पक्षाशी युती करू नये, पण पुढे काय होणार हे आता कसे सांगू? असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here