मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये १५ फेब्रुवारी २०२१ रोजी लहान मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या पालकांकडून नोंदवण्यात आली. या मुलीचं अपहरण झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ताबडतोब मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी मालखेड ते थोपटेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिमुरडीचा मृतदेह पोलिसांना सापडला.
या मुलीवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अहवालात निष्पन्न झालं. त्यांनतर वेल्हे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि एक रिक्षावाला, दुकानदार व इतर साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला एका अतिशय दुर्गम भागातून ४८ तासांच्या आत ताब्यात घेतलं होतं. आरोपीविरुद्ध सी.ए. रिपोर्ट, डी. एन. ए. टेस्टिंग, मेडिकल ग्राऊंड व इतर पुरावे गोळा करून कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
दरम्यान, याप्रकरणी पुणे ग्रामीण अधीक्षकांच्या विंनतीनुसार शिवाजीनगर न्यायालयात जलदगतीने खटला सुरू करण्यात आला आणि अखेर आरोपीला कोर्टाने आता मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.