पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ईडीने नुकतीच राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्यातील कथित घोटाळ्यावरून कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Ncp Jayant Patil) यांचे भाचेदेखील आहेत. या कारवाईबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी सविस्तर बोलणं टाळलं आहे.
जयंत पाटील हे सध्या राज्यभर फिरून परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. पाटील यांची ही यात्रा आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांना तनपुरे यांच्यावरील कारवाईबाबत पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावेळी केवळ एकाच वाक्यात प्रतिक्रिया देणं त्यांनी पसंत केलं. coronavirus in maharashtra करोना: राज्यात आज दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ का झाली?; पाहा, ओमिक्रॉनचीही स्थिती!
काय म्हणाले जयंत पाटील?
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता ‘ते बघतील त्या प्रश्नाकडे’ असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे.
दरम्यान, विविध मंत्र्यांवर होत असलेल्या आक्रमक कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. राजकीय आकसातून केंद्रीय तपास यंत्रणा अशा कारवाया करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. तसंच या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलनही करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य विरुद्ध केंद्र हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.