मुंबई: युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ या मोहिमेतील गोंधळावरून शिवसेनेने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. केंद्राने हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि व्ही.के. सिंह या चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये विशेष दूत म्हणून पाठवले आहे. यापैकी जनरल व्ही.के. सिंह यांना कामाचा अनुभव आहे. जनरल सिंह हे म्हणाले की, चिंतेचे कारण नाही. कुणी हिंदुस्थानी मंगळावर अडकला असला तरी त्याची सुटका करू. सिंह यांचे हे बडेबोलेपण आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. (Shivsena take a dig at Modi government over indian evacuation from ukraine)

ukraine russia news : युक्रेनच्या राजदुतांनी रशियाच्या हल्ल्याची तुलना केली मुघलांशी; म्हणाले, ‘राजपुतांसोबत जे… ‘
पंतप्रधान मोदी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात गुंतल्याने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास बराच उशीर झाला. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी याचा जाब विचारत आहेत. सध्याच्या घडीला युक्रेनमध्ये एकही अमेरिकी नागरिक नाही. मग भारत सरकारला हे का सुचले नाही, असा सवाल एका विद्यार्थिनीने उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारने या सगळ्या कार्यक्रमास ऑपरेशन गंगा असे नाव देऊन उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारातही या सरकारी मोहीमेचा वापर करून घेतला. बिहारमध्ये निवडणुका असत्या तर मोहीमेला ऑपरेशन नालंदा नाव दिले असते. गुजरातमध्ये निवडणुका असत्या तर ऑपरेशन सोमनाथ म्हटले असते. या सगळ्याची आता देशाला सवय झाली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे व घुसवायचे हे ठरूनच गेले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
indian evacuation from ukraine : युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात कसं आणणार? परराष्ट्र सचिवांनी सांगितले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांचा प्रचार सोडून दिल्लीत केवळ उच्चस्तरीय बैठकीसाठी आले होते. युक्रेनमधील आक्रोक्षापेक्षा राज्यकर्त्यांना राजकीय प्रचार सभा, रोड शो वगैरेंचे महत्त्व वाटत असेल तर जनता निराधार आणि वाऱ्यावर आहे, हे मान्य करायला हवे. भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या चार सीमारेषांवर अडकले आहेत. पण त्याठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भारतीय दूतावास किंवा परराष्ट्र मंत्रालयाची यंत्रणा नाही. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे रोमानियात विशेष दूत म्हणून गेले आहेत. पण त्यांच्या स्वत:च्या खात्याचे एक विमानही नाही. एअर इंडियाही विकले. त्यामुळे खासगी विमान कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. भारतीय दूतावास एकदा विद्यार्थ्यांना सांगतो कीवमध्येच थांबा. त्यानंतर काही तासांतच हाच दूतावास सांगतो की, सात तासांत कीव शहरातून बाहेर पडा. या गोंधळामुळे भारतीय विद्यार्थी भयभीत झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here