युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी केली जेवणाची सोय

म. टा. वृत्तसेवा, धुळेः रशिया व युक्रेनमध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्यात रोज नवनवीन घडमोडी घडत आहेत. जेवण घेण्यासाठी बंकरच्या बाहेर पडलेल्या कर्नाटकातील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भारतातील अनेक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. अशा भयानक नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शाहिद बागवान दिवसातून दोनवेळा तीन किलोमीटरचा प्रवास करीत भारतीय विद्यार्थ्यांसाठी चार घासांची सोय करीत आहे. बाहेर बॉम्ब, गोळीबारांचा पाऊस पडत असतानाही जीव धोक्यात घालून आपल्या देशवायीयांसाठी लढा देणाऱ्या बागवानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नऊ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. नवापूर येथील सरदार चौकमध्ये राहणारा कशिश जग्निश शहा हा दोन दिवसांपूर्वी सुखरुप घरी परतला आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शाहिद रफिक बागवान हादेखील युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी मिकोलाइव्ह येथील पेट्रो मोहल्या ब्लॅक सी या विद्यापीठात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. तो तेथे सुखरूप असून, शाहिदशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आम्ही त्याच्या संपर्कात असल्याचे त्याचे वडील रफीक बागवान यांनी सांगितले.

रफिक बागवान यांचा विसरवाडीत केळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शाहिद बागवानचे दहावी पर्यंतचे शिक्षण तालुक्यातील चिंचपाडा येथे झाले. त्यानंतर त्याने औरंगाबाद येथे बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे तो वैज्ञकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेला. सध्या तो तृतीय वर्षात शिकत आहे.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. खार्किवमध्ये जेवण घ्यायला गेलेल्या कर्नाटक राज्यातील नवीन कुमार याला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतांना नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शाहिद जीव धोक्यात घालून आपल्या मित्रांसाठी जेवणासी सोय करीत आहे.

तिकीट दर महागल्याने अडकला

रशिया व युक्रेनमध्ये युद्धाचे ढग जमा होत असताना शाहिद बागवानही भारतात परतण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने विमानाचे २८ एप्रिलचे तिकिटही बुक करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र इतरवेळी २४ ते ३० हजार रुपये दर असलेले तिकिट सध्या ७५ हजारावर गेल्याने त्याने भारतात येण्याचे स्थगीत केले. मात्र आता युद्ध पेटल्याने तोही तिकडे अडकला आहे.

साहित्याची जमवाजमव

युद्ध सुरू होण्याआधी शाहिदने अन्नधान्य भरून ठेवले होते. आता त्याने मित्रांच्या मदतीने भारतीय विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये एकत्र केले आहे. तेथील बाकीच्या विद्यार्थ्यांकडे जेवणासाठीचे साहित्य होते. तेही त्यांनी जमा केले. त्यातील १२ ते १५ विद्यार्थ्यांकडे जेवणासाठी सोय नसल्याने शाहिद हॉस्टेलपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या रुमवरून दोन तीन जणांना सोबत घेत स्वयंपाक तयार डबे पुरवित आहे.

जो डर गया समजो मर गया

युद्ध सुरू झाल्यावर शाहिदच्या पालकांनी त्याच्याशी संपर्क केला. तेव्हा तो घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी त्याचे वडील रफीक यांनी त्याला विचारले, ‘युद्ध परिस्थितीत तुझ्याजवळ काही पर्याय आहेत का? तेव्हा शाहिदने काही पर्याय नसल्याचे सांगितले. त्यावेळी वडील रफीक यांनी शाहिदला शोले चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग ‘जो डर गया समजो मर गया’ची आठवण देत मनोधैर्य वाढवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here