गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकासआघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र ठाकरे सरकारचं पहिलं टार्गेट ठरणार का, हे पाहावे लागेल.
नारायण राणे यांच्यावर गुन्हा का दाखल झाला?
निराधार आरोप करून दिशा सालियनची (Disha Salian) बदनामी केल्याप्रकरणी महिला आयोगाकडून नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाला. तिच्यावर बलात्कार होताना एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक फ्लॅटबाहेर होते, असा दावाही नारायण राणे यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकारपरिषदेत केला होता. त्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनीही अशाचप्रकारच्या आरोपांची राळ उडवून दिली होती.
नारायण राणे यांच्या पत्रकारपरिषदेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे हे मृत्यूनंतरही दिशा सालियन हिचे चारित्र्य बदनाम करत असल्याचा आरोप केला होता. याविरोधात किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे तक्रारही केली होती. त्याचीच दखल घेत महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाला मागवला होता. दरम्यानच्या काळात दिशा सालियन हिच्या आई-वडिलांनीही गलिच्छ राजकारणाचा विरोध करत नारायण राणे यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मालवणी पोलिसांनी महिला आयोगाला अहवाल दिला होता. या अहवालात दिशा सालियन हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे किंवा ती गरोदर असल्याचे नमूद केलेले नाही, ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे महिला आयोगाने दिशा सालियन प्रकरणात खोटे आरोप केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यातच तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.