यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणारे आणि त्यांना मदत करणारे अधिकारी सगळे तुरुंगात जाणार आहेत. महाराष्ट्र पोलीसही तपास करण्यासाठी सक्षम आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मी या सगळ्या गोष्टींचा खुलासा करेन. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून अपहरण आणि खंडणीसारखे गुन्हे घडले आहेत. केंद्रीय तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांना आमचं राज्य आहे, असं वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्र पोलिसांनाही कारवाई करण्याचा अधिकार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे. आगामी काळात महाराष्ट्र पोलीस अपहरण आणि खंडणीच्या आरोपाखाली कारवाई करू शकतात, असे संकेत संजय राऊत यांनी दिले.
उच्च न्यायालयाने नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. तुम्हाला पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात अटक होण्याची भीती वाटते का, हे स्पष्ट करा, असेही न्यायालयाने सोमय्या यांना सांगितले. पण हे बाप-बेटे जेलमध्ये जाणार हे नक्की. मी भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जाणार असे म्हटले होते. ते नेते कोण, त्यांची नावे मला विचारली जात आहेत. पण मी आता नावं दिल्यास हे नेते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आता आगामी काळात खरंच भाजपच्या नेत्यांवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
किरीट सोमय्या यांच्या भूमिकेबाबत आश्चर्य
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना जाहीर आव्हान दिले होते. माझ्यावर गुन्हा दाखल करावा किंवा चौकशी करावी. मी साधे अपीलही करणार नाही. मी चौकशीला थेट सामोरा जाईन, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. मात्र, आता नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.