मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी भातसा धरणाच्या ठिकाणी वीजनिर्मिती केंद्र आहे. तेथे १५ मेगावॉट वीजनिर्मिती होते. त्या केंद्रात रविवारी पाणी शिरल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने व्हॉल्व्ह बंद केल्याने दुर्घटना टळली. मात्र वीजनिर्मिती केंद्रात पाणी शिरल्याने वीजनिर्मितीसह पाणीपुरवठ्यावरही परिणाम जाणवला आहे.
ठाण्यात कमी दाबाने पाणीपुरवठा
भातसा धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजावर तांत्रिक बिघाड झाल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे मध्यरात्रीपासून पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पुढील दोन दिवस ठाणे शहरात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरी नागरिकांनी पाण्याचा जपून करावा आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.