संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांना लक्ष्य केले. आगामी काळात बाप-बेटे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणारे भाजपचे नेते निश्चितच तुरुंगात जातील. माझे हे शब्द लक्षात ठेवा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. केंद्रीय तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांना आमचं राज्य आहे, असं वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्र पोलिसांनाही कारवाई करण्याचा अधिकार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे. आगामी काळात महाराष्ट्र पोलीस अपहरण आणि खंडणीच्या आरोपाखाली कारवाई करू शकतात, असे संकेत संजय राऊत यांनी दिले.
“बिहारमध्ये निवडणुका असत्या तर मिशनचं नाव ‘ऑपरेशन नालंदा’ ठेवलं असतं”
केंद्राने हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि व्ही.के. सिंह या चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये विशेष दूत म्हणून पाठवले आहे. यापैकी जनरल व्ही.के. सिंह यांना कामाचा अनुभव आहे. जनरल सिंह हे म्हणाले की, चिंतेचे कारण नाही. कुणी हिंदुस्थानी मंगळावर अडकला असला तरी त्याची सुटका करू. सिंह यांचे हे बडेबोलेपण आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने या सगळ्या कार्यक्रमास ऑपरेशन गंगा असे नाव देऊन उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारातही या सरकारी मोहीमेचा वापर करून घेतला. बिहारमध्ये निवडणुका असत्या तर मोहीमेला ऑपरेशन नालंदा नाव दिले असते. गुजरातमध्ये निवडणुका असत्या तर ऑपरेशन सोमनाथ म्हटले असते. या सगळ्याची आता देशाला सवय झाली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे व घुसवायचे हे ठरूनच गेले आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली होती.