मुंबई: विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी (Jayant Patil) महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांचा भक्कमपणे बचाव करण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. पण ते नेहमीप्रमाणे चहापानाच्या कार्यक्रमाला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असेही जयंत पाटील म्हणाले. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक आदरणीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
Nilesh Rane : ‘झुकेगा नहीं’ म्हणायला नवाब मलिक काय…; नीलेश राणेंचा जोरदार टोलाFaraz Malik : आता नवाब मलिकांच्या मुलाला ईडीनं दिला दणका; ‘ती’ विनंती फेटाळली
शरद पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्यास त्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे, याची रणनीती निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रचंड आक्रमक होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचं आक्रमण कशाप्रकारे थोपवलं जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here