म. टा. वृत्तसेवा , नवी मुंबई

एकीकडे मुली सर्व क्षेत्रांत कर्तृत्व गाजवत असताना आजही सुनांना सासरी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत असतात. मात्र, उरण तालुक्यातील धुतूम गावातील आगरी समाजातील सासऱ्यांनी आपल्या कृतीमधून सुनेला जीवनदान दिलेच, शिवाय समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. ६२ वर्षीय सुधाकर ठाकूर यांनी दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या सुनेला मूत्रपिंडदान करून जीवनदान दिले आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असून सर्वच सासरच्या मंडळींनी त्यांचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सुनेला मुलीसारखे जपावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

२०११ मध्ये स्नेहा सागर ठाकूर लग्न होऊन जसखार गावातून धुतूम गावात ठाकूर कुटुंबीयांची सून म्हणून आली. काही दिवसांपूर्वी स्नेहा ठाकूर हिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. तिचे वय आत्ता केवळ ३१ आहे. तिच्यावर आठ महिन्यांपासून डायलिसिस सुरू होते. मात्र, डायलिसिस करण्यावरही मर्यादा येतात. त्यावेळी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा पर्याय डॉक्तरांनी त्यांना सुचवला. मात्र मूत्रपिंड कोण देणार, हा प्रश्न होता. त्यावेळी आपल्या सुनेला मुलीसारखे जपणाऱ्या प्रभाकर ठाकूर यांनी तिला मूत्रपिंडदान करण्याचा निर्णय घेतला. आपल्या जीवाची पर्वा न करता स्नेहाचे ६३ वर्षीय सासरे प्रभाकर ठाकूर यांनी सुनेला आपली एक किडनी देऊन नवीन आयुष्य दिले.

डॉ. प्रकाश बाबा आमटेंनी केले पुन्हा एकदा पाण्यात शीर्षासन

युक्रेनहून रत्नागिरीचे आकाश, सिद्धी निघाले मायदेशीच्या प्रवासाला; अवघ्या काही तासांची प्रतीक्षा

सासऱ्यांमुळे आपल्या आयुष्यात आपण दुसऱ्यांदा बाप पाहिला, अशी भावना स्नेहाने व्यक्त केली. सासरा आणि सुनेच्या नात्याचा समाजासमोर एक नवा आदर्श या कृतीतून समोर आला आहे. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून रक्तगट विसंगत असतानाही डॉ. रवींद्र निकालजे व डॉ. अमोल कुमार पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुनेला मूत्रपिंडदान करण्याच्या एक धाडसी आणि कौतुकास्पद निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

आपण अजूनही अशा समाजात रहातो, जिथे आजही लग्नात हुंडा घेण्याची परंपरा अस्तित्वात आहे. परंतु सर्व संबंध रक्ताच्या नात्यांनी बांधलेले नसतात. हेच नाते समाजात रूढ झाले तर सासरी आलेल्या सुनेकडे मुलीसारखेच पाहिले जाईल, अशी प्रतिक्रिया प्रभाकर ठाकूर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here