म.टा. प्रतिनिधी, नगर

महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन असताना आणि त्या पार्श्वभूमीवर शिर्डीचं साई मंदिर बंद असतानाही बाबांवरील श्रद्धेपोटी साईभक्तांनी ऑनलाइन देणग्या (Online Donation to Saibaba) देणं सुरू ठेवलं आहे. ३ एप्रिलपर्यंत साई संस्थानला एक कोटी ९० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.

वाचा:

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ही माहिती दिली. गर्दी टाळणं हा करोनाशी लढण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. हे लक्षात घेऊन देशात लॉकडाऊन होण्याआधीच राज्यातील अनेक देवस्थानांनी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शिर्डीच्या साई संस्थानानंही सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून १७ मार्चपासून मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. दर्शन सोडाच, लॉकडाऊननंतर साईभक्तांना शिर्डीला येणं अशक्य आहे. असं असलं तरी साईभक्तांनी ऑनलाइन पद्धतीनं देणगी देणं सुरूच ठेवले आहे.

याबाबत बोलताना अरुण डोंगरे म्हणाले, ‘साईबाबांचा महिमा व त्‍यांची शिकवण संपूर्ण जगात पोहचलेली आहे. देशात आणि परदेशातही त्यांचे असंख्य भक्त आहे. मंदिर बंद असले तरी साईंचे ऑनलाइन दर्शन सुरू आहे. संस्‍थानाचे संकेतस्‍थळ व मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन दर्शनाचा लाभ साईभक्‍त घर बसल्‍या घेत आहेत. हे दर्शन घेताना साईभक्त मोठ्या श्रद्धेनं साईचरणी दान अर्पण करत आहेत. त्यामुळं गेल्या अठरा दिवसांत १ कोटी ९० लाख २०१ रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here