: पाचोरा तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचं आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसंच आरोपीने पीडित महिलेची आर्थिक फसवणूक करत महिलेकडून ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये आणि सोन्याचे दागिनेही घेतले. याप्रकरणी मंगळवारी रात्री पाचोरा पोलीस ठाण्यात चुलत दीर व सासरे यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ()

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय महिलेच्या पतीचा २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू झाला होता. महिलेचा पती आयटी इंजिनिअर होता. दरम्यान, पतीच्या मुत्यूनंतर चुलत दीर आणि सासू, सासऱ्याने फसवणूक करण्याचा कट रचून संगनमताने महिलेला आई-वडिलांकडे माहेरी जाऊ दिलं नाही. तसंच महिलेला तिच्या चुलत दिरासोबत लग्नाचं आमिष दाखवलं. लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवू असं पीडिता सांगत असतानाही दिराने लग्न करण्याचं आमिष दाखवत बलात्कार केला. तसंच आता तिला लग्नालाही नकार दिला.

चुलत सासरे आणि दीर यांनी महिलेचा विश्वास संपादन करुन वेगवेगळी कारणे काढत महिलेच्या पतीच्या खात्यातील ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये दुसऱ्या खात्यावर वळते करुन घेतले. एवढंच नाही तर महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही आरोपींनी घेतले.

दरम्यान, याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन सज्जनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here