५० टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील अर्धी वीजबिलाची रक्कम म्हणजे २५ टक्के बिल वीज कंपनीने माफ करावी तसेच पुढील ४ महिने थकबाकीमुळे कोणाचाही विजमीटर कापू नये, अशी सूचना रामदास आठवले यांनी वीजकंपन्यांना केली आहे. मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने १८ टक्के वीजबिल माफ केले आहे मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आवाहन मी त्यांना केले असल्याची माहिती आठवले यांनी दिली. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून ३ महिने वीजबिल किमान ५० टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा, असे आवाहनही आठवले यांनी केले.
वीजबिल माफ करण्यासोबत करोनाची चाचणी मोफत करावी किंवा अल्प दरात करण्यात यावी. सध्या करोना चाचणीसाठी ५ हजारांपर्यंत दर आकारले जात आहेत. त्याऐवजी मोफत किंवा रु. ५०० एवढ्या अल्पदरात करोना चाचणी करावी, अशी आपली मागणी असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
रुग्णालयातील डॉक्टरप्रमाणे नर्सेसनाही करोनाचे किट उपलब्ध करून दिले पाहिजे. पुरेशा सुविधा नर्सेसनाही दिल्या गेल्या पाहिजेत. तसेच खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. करोनाला घाबरुन जर खासगी डॉक्टर घरी बसले तर करोनाशी लढा कसा जिंकणार? असा सवाल आठवले यांनी केला असून खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत, असे आवाहन आठवले यांनी केले. रिपब्लिकन कार्यकर्ते विविध ठिकाणी मदत करीत आहेत. त्यांनी रक्तदान करण्यासाठीही पुढे आले पाहिजे असे आवाहन आठवले यांनी केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times