जळगाव : शहरातील कांचननगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दुपारी एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रमेश सुकलाल राजपूत (वय ४८) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी रमेश राजपूत यांच्या १३ वर्षीय मुलानेही आत्महत्या करून जीवन संपवलं होतं. मुलाच्या विरहातून रमेश यांनी आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. (Jalgaon Suicide Case)

रमेश राजपूत हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरत प्रजापत यांच्या दुकानामध्ये बारदान शिलाईच्या कामाला होते. त्यांचा १३ वर्षीय मुलगा यश याने मकर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी रोजी क्षुल्लक कारणावरून गळफास घेतल्याची घटना घडली होती. या घटनेपासून यशचे वडील रमेश हे तणावात असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.

मोठी बातमी! राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, ‘या’ १४ जिल्ह्यांना दिलासा

रमेश राजपूत हे आज नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले होते. अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. यावेळी ‘मला जरा बरं नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो’, असं सांगून रमेश राजपूत हे दुकानात गेले. इतर कर्मचारी हे बाहेर बसून बारदान शिलाई करत होते. काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की, रमेश राजपूत हे बऱ्याच काळापासून बाहेर आले नाहीत. त्यांनी आत जाऊन बघितलं असता, रमेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवलं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी तपासून रमेश राजपूत यांना मृत घोषित केले.

दीड महिन्यातच मुलापाठोपाठ पित्याने संपवलं जीवन

रमेश राजपूत हे अत्यंत मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दीड महिन्याच्या काळातच मुलापाठोपाठ पित्यानेही जीवन संपवल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here