शेतीला दिवसा वीजपुरवठा, सदोष बिलांची दुरूस्ती व थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाई करू नये, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेले काही दिवस महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी सांगितलं की, ‘नऊ दिवस आंदोलन सुरू असूनही महावितरणला जाग आली नाही. त्यामुळे ४ मार्चपासून ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यामधून सरकारने तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल. यातून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी सरकारची राहील,’ असा आक्रमक इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
नितीन राऊत यांचा फोन आल्याची माहिती
‘आमच्या मागण्यांबाबत चर्चेचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत. ऊर्जामंत्री राऊत यांचा फोन आला होता. आंदोलन सुरू ठेवून चर्चा करण्याची तयारी असल्याचं त्यांना कळवलं आहे. या आंदोलनाची दखल सरकारने तातडीने दखल न घेतल्यास भडका उडेल,’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकार मादनाईक, जयकुमार कोले उपस्थित होते.