रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर या दोन्ही देशांतील नागरिकांसहीत इतर अनेक देशांच्या युक्रेनस्थित नागरिकांनाही युद्धाची झळ पोहचतेय. यात भारतीय नागरिक आणि मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. युक्रेनमधल्या अस्थिर वातावरणात आज आणखी एका भारतीय विद्यार्थ्यानं आपला जीव गमावल्याचं समोर येतंय. दरम्यान, भारतीयांची युक्रेनमधून सुटका करण्यासाठी भारतीय वायुसेनेची चार विमानांनी जवळपास ८०० नागरिकांना घेऊन युक्रेनमधून उड्डाण घेतलंय. ही विमानं आज रात्री १.३० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत भारतात गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर दाखल होण्याची शक्यता आहे.
१७ हजार भारतीय युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडले
दरम्यान, आतापर्यंत जवळपास १७ हजार भारतीयांनी सुखरूपपणे युक्रेन सोडल्याची माहिती केंद्र सरकारनं दिलीय. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत ३३५२ भारतीय भारतात दाखल झाले आहेत तर पुढच्या २४ तासांत १५ उड्डाणं नियोजित आहेत, त्यापैंकी काही आपल्या मार्गावर आहेत, असंही केंद्रानं म्हटलंय.
‘तत्काळ खारकीव्ह सोडा’
‘खारकीव्ह सोडा, गाडी मिळाली नाही तर पायी निघा’, असा सल्ला भारतीय दूतावासानं युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, तासाभरात भारतीय दूतावासाकडून दुसऱ्यांदा हा सल्ला देण्यात आलाय. युक्रेनमधील भारतीय दूतावासानं खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी २ मार्च रोजी दुसरी सूचना जारी केलीय.
युक्रेनमध्ये दोन विद्यार्थ्यांनी गमावले प्राण
मूळ पंजाबचा रहिवासी असलेल्या परंतु, युक्रेनमध्ये एमबीबीएस करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा ब्रेन हॅमरेजमुळे युक्रेनमध्ये मृत्यू झालाय. बरनालाचा रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याचं नाव चंदन जिंदल असं असल्याचं समजतंय. चंदन २०१८ पासून युक्रेनच्या वनीशिया शहरातील ‘नॅशनल पिरोगोव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी’त एमबीबीएसचं शिक्षण घेत होता.
बुधवारी, २ फेब्रुवारी रोजी रात्री चंदनला अचानक अटॅक आला आणि तो कोमामध्ये गेला. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. ७ फेब्रुवारी रोजी त्याचे वडील आणि काका त्याच्यासोबत राहण्यासाठी युक्रेनला दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच चंदनचा काल ब्रेन हॅमरेजनं मृत्यू झाला. त्यानंतर आता त्याचे वडीलही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.
यापूर्वी, कर्नाटकातील हावेरी इथल्या नवीन शेखरप्पा ग्यानगौदार या भारतीय विद्यार्थ्याचा मंगळवारी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्यू झाला होता.