कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराविरुद्ध लढण्यास आपण १३० कोटी भारतीय एकत्र आहोत. कुणीही एकटे नाही, हेच या उपक्रमातून पंतप्रधानांना सांगायचे आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. संपूर्ण देशाने या आवाहनाचे पालन करावे. वीज यंत्रणेवर ताण येईल असे तांत्रिक प्रश्न निर्माण करण्यात आले. गेल्या पाच वर्षात राज्यात अनेकवेळा लाइट बंद करण्यात आलेली आहे. तसेच देशात यापूर्वी १५ हजार मेगावाट विजेचे बॅकडाऊन झाले आहे. राज्यातही २५०० मेगावाटचे बॅकडाऊन झाले आहे. पंतप्रधानांनी फक्त ९ मिनिटे लाईट बंद करण्यास सांगितले आहे. विजेचे अन्य उपकरणे मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रीड वर त्याचा परिणाम होणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
आपल्या राज्यात कोयनासारखे ९ मिनिटात सुरू व बंद होणारे वीज प्रकल्प आहेत. एसएलडीसीचे व केंद्र सरकारचे तांत्रिक अधिकारी यावर अभ्यास करीत आहे. राज्याकडे हुशार तांत्रिक अधिकारी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पंतप्रधानांनी महामारी विरुद्ध सर्वाना एकत्र लढण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक बाबी दाखवून त्यावर फाटे फोडू नयेत, असेही बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. हा आकडा कसा कमी होईल? यावर ऊर्जामंत्र्यांनी बोललं पाहिजे. काही ठिकाणी डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाली आहे. डॉक्टरांवरील या हल्ल्यांवर ऊर्जामंत्र्यांनी बोलायला हवं. त्यांनी नको त्या विषयावर बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times