भारताचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिक-विद्यार्थी आणि त्यांच्या भारतातील चिंताग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. ज्योतिरादित्य शिंदे खुद्द या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी तसंच भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची व्यवस्था पाहण्यासाठी बुधवारी बुखारेस्टमध्ये दाखल झालेले आहेत.
शिंदे ४८ तास ‘सिरेत‘मध्ये
गुरुवारी युक्रेनसह सीमावर्ती चौकी असलेल्या सिरेत भागाला ज्योतिरादित्य शिंदे भेट देणार आहेत. पुढचे ४८ तास विद्यार्थ्यांना भारतात रवाना करण्यासाठी ते इथेच थांबणार आहेत. ‘शेवटचा विद्यार्थी सिरेतहून बाहेर पडेपर्यंत मी इथेच थांबणार आहे’, असं शिंदे यांनी म्हटलंय.
२४ उड्डाणांची व्यवस्था
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुखारेस्ट आणि सुकिव्हिया मार्गे बुधवार ते शुक्रवार दरम्यान जवळपास ४८०० भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर काढलं जाईल. यासाठी तब्बल २४ उड्डाणं रोमानियामधून नियोजित करण्यात आली आहेत, असं शिंदे यांनी म्हटलंय. ‘बुखारेस्टमध्ये जवळपास ३००० आणि सिरेतमध्ये जळपास हजार भारतीय विद्यार्थी दाखल झालेले आहेत’, अशी माहिती शिंदे यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत दिली.
सिरेत चेकपोस्टवर आणखी सुमारे हजार विद्यार्थी दाखल होण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसांत त्यांना भारतात परत पाठवण्याची सरकारला आशा आहे, असंही शिंदे यांनी म्हटलंय.
बुधवारी बुखारेस्ट इथून सुमारे १३०० विद्यार्थ्यांना घेऊन सहा विमानांनी भारताकडे उड्डाण घेतलं. गुरुवारी १३०० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी सहा विमानं बुखारेस्टहून निघणार आहेत. मंगळवारी रात्री विमानतळावर २०० – ३०० विद्यार्थ्यांची भेट घेतल्याचंही केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलंय.